

Pune Ganesh mandap removal order
पुणे: पुण्यातील गणेशोत्सव पूर्ण होऊनही रस्त्यावरील मंडप व देखावे न काढल्यामुळे सोमवारी (दि.8) नागरिक वाहतूक कोंडीमुळे वैतागले होते. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर उभारलेले मंडप तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या रथ आणि ट्रॉलीज काढून टाकावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.
शनिवारी आणि रविवारी पार पडलेल्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला विक्रमी 34 तास 45 मिनिटांचा वेळ लागला. मात्र, रस्त्यावर देखावे आणि मंडप तसेच असल्याने दुसर्याच दिवशी नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले. (Latest Pune News)
प्रमुख रस्त्यांवर उभारलेले मंडप तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या रथ आणि ट्रॉलीज रस्त्याच्या कडेला तशाच उभ्या असल्याने वाहतुकीला अडथळा झाला. त्यामुळे गणेश मंडळांनी तातडीने मंडप व देखावे रस्त्यांवरून काढावे, असे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे.
मिरवणुकीनंतरही ट्रॉलीज रस्त्यांच्या कडेला उभ्या
यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर रोजी पारंपरिक मिरवणुकीनंतर संपन्न झाला. मात्र, अद्यापही शहरातील विविध रस्त्यांवर मंडप कायम असल्याने अर्धा रस्ता व्यापला गेला आहे. त्यातच देखावे, साउंड सिस्टीमसाठी वापरलेल्या ट्रॉलीज काही भागात मुख्य रस्त्यांच्या कडेलाच उभ्या आहेत. या स्ट्रक्चर्समुळे वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली.
गणेश मंडळांनी तातडीने मंडप व ट्रॉलीज रस्त्यावरून हलवाव्यात. तसेच, मंडप उभारणीसाठी ज्या ठिकाणी खड्डे खणले असतील ते त्वरित बुजवावेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे ही मंडळांची जबाबदारी आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका, पुणे