Recruitment Pudhari
पुणे

Pune Center Head Recruitment 2026: केंद्रप्रमुख भरतीला गती; पुणे जिल्ह्यात १५१ नव्या पदांना मंजुरी

दीर्घ प्रतीक्षेनंतर रखडलेली केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात; शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: राज्यातील केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, २०२३ पासून विविध कारणांमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना न्याय मिळणार असून, पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी आता १५१ नवे केंद्रप्रमुख मिळणार आहेत. या प्रक्रियेत कागदपत्रांची छाननी करून पात्र-अपात्र याद्या घोषित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

राज्यातील ४,८२० केंद्रप्रमुख पदांपैकी २,४१० पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे, तर उर्वरित २,४१० पदे सेवाज्येष्ठतेच्या आधारे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भात विविध याचिका दाखल झाल्यानंतर प्रकरणाची सखोल न्यायालयीन छाननी झाली. मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात विविध मुद्द्यांवर सुनावण्या झाल्या असून, या प्रक्रियेतील अनेक बाबी कायदेशीर तपासणीच्या कसोटीवर तपासल्या गेल्या आहेत.

त्यामुळे ही भरती प्रक्रिया केवळ प्रशासकीय निर्णयावर आधारित न राहता न्यायालयीन परीक्षणातून पुढे आलेली आहे. गेल्या २६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून भरती प्रक्रियेवरील ‘जैसे थे’ (स्टेटस को) आदेश उठल्यामुळे या प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाला आहे. यामुळे नियुक्त्या तातडीने देण्याची अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. गेल्या काही वर्षांत शिक्षकांवर विविध ऑनलाइन नोंदी, अहवाल, माहिती संकलन आणि प्रशासकीय कामांचा मोठा भार वाढला होता. सक्षम केंद्रप्रमुख उपलब्ध झाल्यास या कामांचे अधिक परिणामकारक समन्वयन होऊन शिक्षकांचा वेळ अध्यापनासाठी उपलब्ध होईल, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, गुणवत्ता विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रप्रमुखांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

गेल्या काही वर्षांपासून केंद्रप्रमुखांची भरती प्रक्रिया रखडली होती. आता कुठे ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, काहींनी या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर स्टे उठविला आहे. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहत ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारने आता गुणवत्ताधारक शिक्षकांना तातडीने नियुक्त्या देणे गरजेचे आहे.
राजेंद्र खैरनार, केंद्रप्रमुख, राज्य कोअर टीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT