Arrested Pudhari
पुणे

Pune Car Theft Gang Arrested: पुण्यात मोटारीची काच फोडून चोरी करणारी तामिळनाडूची टोळी जेरबंद; विमानतळ पोलिसांची कारवाई

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध; रोकड, केसांचे चाप आणि छर्रे जप्त, येरवडा-खराडीतील गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मोटारीची काच फोडून रोकड चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये, केसांचे चाप, तसेच छर्रे असा मुद्देमाल जप्त केला.

राजा आरमुग्गम (वय ४७, रा. गांधीनगर, त्रिचरापल्ली, तामिळनाडू), लक्ष्मणन एस. संथाकुमार (वय ४०, रा. पुंगनुर, श्रीरंगम, तामिळनाडू), मुथ्थूलिंगम परमानंद लिंगम (वय ४०, रा. पेरंबुर, तंजावर, तामिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका माॅलसमोर महागड्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पिशवी, मोबाईल, रोकड चोरून नेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चित्रीकरणात संशयित चोरटे दिसून आले होते. खराडी बाह्यवळण मार्गावर चोरटे थांबल्याची माहिती खबऱ्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना दिली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून केस बांधण्यासाठी महिला वापरत असलेले चाप, रोकड, छर्रे असा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी येरवडा, खराडी, तसेच लातूर परिसरात मोटारीची काच फोडून रोकड, तसेच मुद्देमाल चोरून नेण्याचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके, उपनिरीक्षक नितीन राठोड, दिलीप पालवे, योगेश थोपटे, राहुल जोशी, हरिप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, रुपेश पिसाळ, लालू कुऱ्हे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT