पुणे : संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर कारचालक महिलेने एकाला फरफटत नेले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारचालक महिलेला अटक केली. याप्रकरणी कारचालक महिला मेरसेदे रसुलीफर (वय ४५) हिला अटक करण्यात आली.
या घटनेत राम लक्ष्मण राठोड (वय ३४) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक महिला शनिवारी (दि.१७ जानेवारी) येरवड्यातील सादलबाब दर्गा रस्त्याने संगमवाडीकडे निघाली होती. त्या वेळी तेथून निघालेल्या कारचालक राम राठोड याच्याबरोबर किरकोळ अपघातानंतर वाद झाला.
राठोड याने कार थांबवून कारचालक महिला मेरसेदे हिला कारमधून बाहेर येण्यास सांगितले. मात्र, तिने कार सुरूच ठेवली. कारच्या समोर राठोड थांबले. कार सुरू ठेवल्याने राठोड यांनी मोटार अडविण्याचा प्रयत्न केला.
कारचालक महिलेने कार तशीच पुढे नेली. प्रसंगावधान राखून राठोड यांनी बोनेट धरून ठेवले. मेरसेदे हिने कार दोन किलोमीटर पुढे नेली. या घटनेची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.