Waste Management Pudhari
पुणे

Pune Cantonment Waste Management: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; रोज ३० ते ४० टन कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ

हडपसर प्रक्रिया केंद्राची क्षमता अपुरी; कचरा व्यवस्थापनासाठी २० कोटींची गरज, निधीअभावी उपाययोजना रखडल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अपुरे मनुष्यबळ आणि प्रक्रिया केंद्राची संपलेली क्षमता यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील अतिरिक्त कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. हडपसर येथील कचरा प्रक्रिया केंद्रात दररोज ५० टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत असताना छावणी परिसरातून ८० ते ९० टन कचरा जमा होत आहे. त्यामुळे दररोजच्या ३० ते ४० टन अतिरिक्त कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न पुणे छावणी मंडळापुढे उभा राहिला आहे.

हडपसर येथील प्रक्रिया केंद्र चालविणाऱ्या भूमी ग्रीन एनर्जी (बीजीई) या संस्थेसोबतच्या करारानुसार, दररोज ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. मात्र, कचरा संकलन वाढल्याने केंद्रावरील ताण वाढला आहे. प्रक्रिया क्षमतेत वाढ केल्याशिवाय अतिरिक्त कचरा स्वीकारणे शक्य नसल्याचे संस्थेने मंडळाला कळविले आहे. अतिरिक्त कचऱ्यासाठी स्वतंत्र शुल्क देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, माश्या, डास आणि भटक्या जनावरांचा त्रास वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. दीर्घकाळ कचरा साचल्यास माती व भूजल दूषित होण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणाला तोंड देण्यासाठी प्रक्रिया क्षमता, वाहने आणि निधी या तिन्ही आघाड्यांवर मंडळाला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

कचरा संकलनासाठी अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळाचीही गरज आहे. तसेच प्रक्रिया क्षमता वाढविण्याची देखील गरज असून, त्यासाठी अतिरिक्त २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र निधीअभावी सर्व कार्यवाही रखडली आहे, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यानी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला

आर्थिक अडचणीत असलेल्या मंडळाला हा खर्च परवडणारा नसल्याने पेच निर्माण झाला आहे. अतिरिक्त कचरा कुठे टाकायचा? दररोजच्या अतिरिक्त ३० टन कचऱ्यावर प्रक्रिया कशी करावी, यासाठी आमच्याकडे व्यवहार्य पर्याय नाही. संबंधित संस्थेने अतिरिक्त कचरा न पाठविण्यास वारंवार सांगितले आहे. मात्र, हा कचरा कुठे टाकायचा, हा प्रश्न आहे, अशी माहिती बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दैनंदिन कचऱ्याचा आढावा

  • दररोज कचरा संकलन : ८० ते ९० टन

  • प्रक्रिया केंद्राची क्षमता : ५० टन

  • अतिरिक्त कचरा : ३० ते ४० टन

  • क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित गुंतवणूक : सुमारे २० कोटी रुपये

उघड्यावर कचरा टाकल्याने दुर्गंधी, माश्या, डास आणि भटक्या जनावरांचा त्रास वाढू शकतो. दीर्घकाळ कचरा साचल्यास माती व भूजल दूषित होण्याचा आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचा संभव आहे. पर्यायी प्रक्रिया व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे.
श्रीकांत होले, स्थानिक, हडपसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT