पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या ताब्यातील काही जमिनींचे बेकायदा वक्फ मालमत्ता म्हणून वर्गीकरण केल्याच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, 'काही दिवसांपूर्वी 'डिमॉस फाउंडेशन - सेंटर फॉर रिसर्च इन ह्यूमॅनिटीज संस्थे'ने याबाबत सविस्तर शिफारसी व निवेदन दिले आहे.
तसेच पुणे कँटोन्मेंटमधील अनेक नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. काही धार्मिक संस्थांनी संरक्षण व केंद्र सरकारच्या मालकीची जमीन, जी पूर्वी विशिष्ट इस्लामिक संस्थांना तात्पुरत्या भाडेपट्ट्यावर दिली होती, ती वक्फ मालमत्ता म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप यात केला आहे. हे सर्व कायद्याच्या तरतुदींना व मालमत्ता नियमांना धरून नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.'