Pune Cantonment Board Pudhari
पुणे

Pune Cantonment Encroachment: पुणे कॅम्पमध्ये ५० हून अधिक अतिक्रमणांवर हातोडा; कारवाईच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह

पदपथ, साईड मार्जिन आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे हटविली; सर्व परिसरात मोहीम राबविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड- पीसीबी) प्रशासनाने कॅम्प परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ५० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र, ही कारवाई ठराविक परिसरात न करता समांतर पातळीवर होणार का, सातत्य राखले जाणार का? असे प्रश्न स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी उपस्थित केले आहेत, तर टप्प्याटप्प्याने इतर परिसरातही कारवाईची मोहीम राबविण्यात येईल, असे स्पष्टीकरण कॅन्टोन्मेंट मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

कॅम्पमधील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एम.जी. रोड, ईस्ट स्ट्रीट, फॅशन स्ट्रीट, मोलेदिना रोड, ताबूत स्ट्रीट आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरात गेल्या काही वर्षांत अनेकदा अनधिकृत अतिक्रमण मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून कारवाई झाल्यानंतर काही दिवसांत पुन्हा अतिक्रमण झाल्याचे दिसून आले.

रस्त्यांच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत, तसेच पदपथांवर पथारीवारे, छोटे किरकोळ व्यापारी, टपरीधारक, हातगाड्यांवर खाद्य पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक आणि इतर वस्तूंची बिनदिक्कत विक्री करीत असल्याने पदपथ नाहीसे झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून अडथळ्यांची शर्यत करावी लागते. लहान आणि शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना चालताना अडचणी येत असून वाहतूककोंडी, अडथळे, अपघात वाढत आहे.

प्रदूषण समस्या वाढली असून, व्यावसायिकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. पूना कॉलेज, बाबाजान दर्गा मागे कॅम्प परिसरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याची कारवाई केली. या कारवाईचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात आले, तर काही व्यावसायिकांनी सर्वच परिसरात अतिक्रमणधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी करून त्याचे सातत्य कायम ठेवावे, असे सांगितले.

कॅम्पमध्ये साईड मार्जिन, फूटपाथ, रस्त्याच्या कडेला उभारलेले स्टॉल, अनधिकृत शेड, फलक आणि दुकानांसमोरील वाढीव बांधकामे अशा विविध स्वरूपातील अतिक्रमणांचा प्रश्न आहे. त्यामुळे एक-दोन ठिकाणी कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. ज्या निकषांवर साईड मार्जिनवरील बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्याच निकषांवर सर्व भागांची पाहणी करून कारवाई करावी.
फारूक शेख, स्थानिक
प्रशासनाने अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम, ही मोहीम कायमस्वरूपी आणि सातत्याने केली जावी. कारण कारवाई करून गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अतिक्रमण केले जाते. तसेच एकाच किंवा ठराविक ठिकाणी कारवाई न करता ताबूत स्ट्रीट आणि इतर परिसरातही ही मोहीम राबवावी.
इमाम रशीद, व्यावसायिक
कॅन्टोन्मेंट परिसरात टप्प्याटप्प्याने सर्वच अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मोहीम आहे. मनुष्यबळ आणि पोलिस प्रशासनाची साथ यामुळे कारवाईत अडथळे येतात. मात्र, नियोजनानुसार सर्वच परिसरात कारवाई करण्याचे नियोजन आहे.
विजय चव्हाण, कार्यकारी अभियंता, कॅन्टोन्मेंट बोर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT