Ganja Seized Arrest Pudhari
पुणे

Pune Cannabis Network: पुण्यात गांजाचा विळखा वाढतोय; १०७ किलो गांजा जप्त, युवक अटकेत

शहरात ड्रग्सचे जाळे सक्रिय; कॉलेज तरुणाई लक्ष्य, खडकी पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वेळ रात्री सात ते आठची. टिंगरेनगर भागातल्या एका बैठ्या घरात गांजा मिळतोय, अशी टीप कॉलेजच्या काही मुलांच्या टोळक्याला लागते. ते दबकत तिथे पोचतात, तर तिथे एक दृष्टिहीन, दिव्यांग माणूस बसलेला दिसतो. त्याला एक मुलगा म्हणतो, माल आहे का? समोरून उत्तर येते, “किती पाहिजे?” काही क्षणांत पैसे हातात देताच गांजाची पुडी मिळते. आणि तरुण तिथून निघून जातो. हा एखाद्या चित्रपटातील प्रसंग नाही, तर पुण्यात दररोज दिसणारे हे चित्र आहे. शहरातील झोपडपट्ट्या, पानटपऱ्या, पब परिसरातील पेडलर्स आणि उच्चभ्रू वस्त्यांतील गुप्त ठिकाणांमधून गांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असून, या नशेचे प्रमुख लक्ष्य बनली आहे शहरातील तरुणाई.

शहरातील विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरांमध्येही गांजा सहज उपलब्ध होतो. पब, कॅफे आणि हॉटेलांच्या आसपास फिरणारे पेडलर्स संभाव्य ग्राहकांवर लक्ष ठेवून असतात. ओळख पटताच काही मिनिटांत व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे कॉलेज विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि तरुण-तरुणी हे या साखळीचे प्रमुख ग्राहक बनले आहेत. शहरातील अनेक पानटपऱ्यांवरही गुप्तपणे गांजाच्या पुड्या ठेवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वसामान्य ग्राहकाला याचा पत्ताही लागत नाही; मात्र, नियमित ग्राहकांची ओळख पटताच माल उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे अमली पदार्थांच्या विक्रीसाठी एक समांतर आणि छुपी व्यवस्था शहरभर कार्यरत असल्याचे चित्र आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गांजाबाबत समाजमाध्यमांवर आणि मित्रमंडळीत पसरविल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे अनेक तरुण त्याकडे ‘सुरक्षित’ किंवा ‘फॅशन’ म्हणून पाहतात. स्वस्त दर, सहज उपलब्धता आणि इतरांना लगेच लक्षात न येणारे सेवन या कारणांमुळे गांजाचे आकर्षण वाढत आहे. परिणामी व्यसनाधीनतेचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, परिसरातील नागरिकांना आणि नियमित ग्राहकांना विक्रीची ठिकाणे माहिती असताना पोलिस आणि यंत्रणांच्या नजरेत ही ठिकाणे का येत नाहीत, असा सवाल विचारला जात आहे. अधूनमधून होणाऱ्या कारवाया आणि प्रत्यक्षात सुरू असलेली विक्री यामधील तफावत स्पष्टपणे जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गांजाच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी केवळ पोलिस कारवाया पुरेशा ठरणार नाहीत. पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

‘गांजा सुरक्षित आहे’ हा सर्वात मोठा गैरसमज

गांजा नैसर्गिक असल्याने तो सुरक्षित आहे किंवा दारूपेक्षा कमी घातक आहे, अशा समजुती तरुणांमध्ये वेगाने पसरत आहेत. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ गांजाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गांजाकडे ‘फॅशन’ नव्हे, तर गंभीर व्यसन म्हणून पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

रेंजहिल्समध्ये १० लाखांच्या गांजासह युवक अटकेत

खडकी पोलिसांनी रेंजहिल्स येथील फुटबॉल मैदानाजवळ कारवाई करून एका युवकाला १०७ किलो १४० ग्रॅम गांजासह अटक केली. त्याच्याकडून गांजा, आयफोन आणि बॅगसह एकूण १० लाख ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ जूनच्या रात्री खडकी पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. दीड वाजताच्या सुमारास रेंजहिल्स येथील फुटबॉल मैदानाजवळ एक युवक संशयास्पदरीत्या बॅग घेऊन उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच तो तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत त्याने आपले नाव अनिकेत नीरज मलिक (वय २८) असे सांगितले. तो सध्या शिवणे येथील सिद्धिविनायक इमारतीच्या डी कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असून, मूळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हिरव्या रंगाचा गांजा आढळला. गांजाचे एकूण वजन १०७ किलो १४० ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत आरोपीने हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून १० लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा, ४० हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन-१३ तसेच एक शालेय बॅग असा एकूण १० लाख ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास खडकी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT