Gun Pudhari
पुणे

Pune Businessman Robbery Case: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार; २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार

२२ तोळे सोने हिसकावून चोरटे फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जमीन खरेदी- विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले. चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात व्यावसायिक संतोष हे जखमी झाले.

त्यांच्या चेहऱ्याला गोळी लागली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. ५) रात्री साडेआठच्या सुमारास गावडेवाडी, शिरसवाडीतील पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली.

दरम्यान, व्यावसायिकाला लुटल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात पसार झाले होते. पुणे पोलिसांनी ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिली होती. त्यानुसार धारमध्ये स्थानिक पोलिसांनी या तिघा आरोपींना गुरुवारी दुपारी पकडण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहून हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. या आरोपीपैकी काही आरोपी हे उत्तर प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. पुणे पोलिस मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात असून, काही पथके त्यांच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाडेबोल्हाई चौकात ऑफिस आहे. नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करून आपल्या मोटारीतून ते घराकडे निघाले. रात्री साडेआठच्या सुमारास पंडित गावडे यांच्या घराजवळ आले असताना एक व्यक्ती रस्त्यात दुचाकीला किक मारत होता.

त्यामुळे संतोष यांनी मोटारीचा वेग कमी करून ती थांबवली. तेवढ्यात पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर दोन व्यक्ती आले. त्यापैकी एकाने संतोष यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे मोटारीची काच फुटली व गोळी संतोष यांच्या चेहऱ्याला लागली. गंभीर जखमी झाल्याने संतोष मोटारीतच होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन सोनसाखळी हिसकावल्या.

त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी संतोष यांच्याकडे धाव घेतली. मात्र, तेवढ्यात तिघा चोरट्यांनी एक दुचाकी घटनास्थळीच सोडून दुसऱ्या एका दुचाकीवर पळ काढला.

संतोष यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती फिर्यादींना त्यांच्या चालकाने दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संतोष यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, गौहर हसन, डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलिस आयुक्त अनिता मोरे, सुनील दोरगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप आरोपी फरार आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

रेकी अन्‌ लुटीचा ट्रॅप

आरोपींनी व्यावसायिकांची रेकी केल्याचा अंदाज आहे. व्यावसायिक किती वाजता ऑफिसला येतात, किती वाजता परत जातात. तसेच, आरोपीपैकी एकाने त्यांच्या रस्त्यात दुचाकी बंद पडल्याचे नाटक करून रस्ता अडवल्याचे प्रथमदर्शी दिसून येते, तर त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर दोघे येतात. त्यातील एकाने व्यावसायिकावर गोळीबार केला. त्यानंतर तिघांनीही सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. त्यामुळे रेकी अन्‌ लुटीचा ट्रॅप आरोपींनी तयार केल्याचे दिसते.

तीन जणांनी व्यावसायिकावर गोळीबार करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हिसकावले. गोळी लागल्याने व्यावसायिक जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहेत.
- अबिनाश कुमार, पोलिस उपायुक्त, परिमंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT