पुणे: आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमधील खोलीत उद्योजकाचा मृतदेह आढळून आला. उद्योजकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशोक मिलापचंद जैन (वय 61, रा. लोढा पार्क, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे मृतावस्थेत सापडलेल्या उद्योजकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार स्वारगेट पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, शनिवारी दुपारी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधला. हॉटेलमधील खोलीचा दरवाजा बंद असून, आतमध्ये असलेल्या व्यक्तीकडून प्रतिसाद दिला जात नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचारी हॉटेलमध्ये पोहचले.
पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा जैन हे खोलीत बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी ओळख पटविल्यानंतर जैन यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ‘जैन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
शवविच्छेदन अहवालात मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल,’ असे डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिशा निंबाळकर यांनी सांगितले. पोलिसांनी हॉटेलमधील खोलीची पाहणी केली. खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. जैन यांनी चिठ्ठीत आर्थिक समस्यांबाबत उल्लेख केला आहे. नातेवाइकांच्या मदतीने चिठ्ठीची पडताळणी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.