दिगंबर दराडे
पुणे: घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या एका नामांकित बिल्डरविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, संबंधित बिल्डरची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रामुख्याने पुणे, ठाणे आणि मुंबई परिसरात तब्बल 1200 ग््रााहकांची 800 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
अनेक वर्षांपासून फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप या बिल्डरवर आहे. तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्प पूर्ण न केल्याने आणि पैसे परत न दिल्याने अखेर प्रकरण प्रशासनाच्या दारात पोहचले. चौकशीत प्राथमिकदृष्ट्या फसवणुकीचे गंभीर प्रकार उघडकीस आल्याने महसूल व पोलिस यंत्रणांनी संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. संबंधित बिल्डरच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांची नोंद घेऊन त्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी आयुष्यभराची बचत या प्रकल्पात गुंतवली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्प रखडल्याने त्यांना आर्थिक व मानसिक फटका बसला आहे. घर खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलिस खात्यातही महसूलचे वाद
सध्या पोलिस खात्यामध्ये सर्वाधिक तक्रारी जमिनीच्या वादासंदर्भात होत आहेत. अनेक ठिकाणी प्लॉट जागेवर आहेत. मात्र, दुसरेच कोणी तरी मालक झालेले पाहायला मिळत आहे. सातबारा एकाचा, तर मालकी दुसऱ्याची, असे प्रकार हवेली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
नागरिकांनी कागदपत्रे तपासावीत, घर खरेदी करताना नागरिकांनी प्रकल्पाची सर्व कागदपत्रे, परवानग्या आणि नोंदणीची खातरजमा करूनच व्यवहार करावा, फसवणूक करणारी टोळी वाढली आहे. त्यामुळे तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी. महारेराची देखील ऑनलाइन तक्रार करता येते. कमीत कमी किमतीत मिळणारे प्लॉट, घर खरेदी करताना सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. अनेकांना आमिष दाखविण्यात येते. फसवणूक झालेली लवकर समजत नाही.रोहन सुरवसे पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते