Budhwar Peth Police Raid Pudhari
पुणे

Pune Budhwar Peth Police Raid: बुधवार पेठेत मध्यरात्री मोठी पोलिस कारवाई; 39 कुंटणखान्यांची झडती

अल्पवयीन मुली आढळल्या, दोन बांग्लादेशी महिला ताब्यात; ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांचा कडक संदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बुधवार पेठेतील कुंटणखान्यात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. 11) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेसह इतर पोलिस ठाण्यांच्या पथकांच्या माध्यमातून मोठी कारवाई केली. या वेळी येथील तब्बल 39 कुंटणखान्यांची पोलिसांनी कसून तपासणी केली. त्या वेळी काही अल्पवयीन मुली आणि दोन बांग्लादेशी महिला मिळून आल्या तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली. प्रथमच पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर झाल्याचे बोलले जाते आहे.

दरम्यान, वेश्यागमनासाठी आलेल्या दोनशे ते तीनशे व्यक्ती या वेळी पोलिसांना मिळून आल्या. या सर्वांना पहाटेपर्यंत रस्त्यावर बसवून ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांची नावे घेऊन सोडून देण्यात आले. तीन पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस आयुक्त, 55 पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

रात्री अकरा वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. याप्रकरणी बुधवारी (दि. 11) रात्री उशिरापर्यंत फरासखाना पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

बुधवार पेठेतील कुंटणखान्यात बांग्लादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. तसेच, यापूर्वी देखील येथून अनेक बांग्लादेशींना पोलिसांनी पकडले आहे. मात्र, गेल्या आठवड्यात फरासखाना पोलिस ठाण्यात एका बांग्लादेशी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिला वेश्याव्यवसायात ढकलणारा दलाल, तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला होता.

चौकशीदरम्यान फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस हवालदाराचे नाव समोर आले. ही बांग्लादेशी तरुणी या महिला पोलिस हवालदाराला मदतीसाठी भेटली होती. परंतु, महिला पोलिस हवालदाराने ही माहिती आपल्या वरिष्ठांना न देता, पीडित तरुणीला पोलिस चौकीत घेऊन जाऊन तिच्या कुंटणखाना मालकिणीला बोलावून घेऊन ताब्यात घेतले. या महिला पोलिस हवालदाराने काही पैसे घेतल्याचा देखील आरोप आहे. हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर महिला पोलिस हवालदाराला पोलिस खात्यातून निलंबित केले आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील फरासखाना पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या तत्कालीन कर्मचारी आणि बुधवार पेठेतील कुंटणखाने चालविणाऱ्यांचे लागेबांधे समोर आले होते. काही पोलिस कर्मचाऱ्यांना गैरव्यवहारापोटी पोलिस खात्यातून निलंबितच नव्हे तर बडतर्फही केले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली. अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकारी सोडता कोणालाच कोठे काय कारवाईसाठी जायचे आहे, याची माहिती नव्हती.

रात्री अकराच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला. पोलिसांनी 39 कुंटणखान्यांची कसून चौकशी केली. त्या वेळी काही अल्पवयीन मुली त्यांना मिळून आल्या. तसेच, दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले. तर रामेश्वर बिभीषण बिराजदार (रा. लातूर) याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्या ताब्यातून चरस आणि नशेसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन जप्त केली आहेत. वेश्यागमनासाठी आलेल्या दोनशे ते तीनशे व्यक्तींना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन रस्त्यावर बसविले.

पोलिसांनी पकडल्यामुळे त्यांची एकच धांदल उडाली. शेवटी त्यांची नावे घेऊन पहाटे त्यांना सोडून देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, कृषिकेश रावले आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी केली.

फरासखाना पोलिसांना कारवाईचा सुगावा नाही

बुधवार पेठेतील कुंटणखान्यांचा परिसर फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. बांग्लादेशी तरुणीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न देता तिला सोडून दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस हवालदार याच पोलिस ठाण्यात नेमणुकीस होत्या. कारवाईची माहिती अगोदरच पोलिस ठाण्यांना दिली तर कुंटणखाने चालविणारे दलाल अलर्ट होतात. त्यामुळे या कारवाईवर लक्ष ठेवून असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फराखाना पोलिसांना ऑपरेशन सुरू होईपर्यंत याची माहिती दिली नाही. उशिरा त्यांना या कारवाईबाबत सांगण्यात आले.

बेकायदा वास्तव्यास असेल्या बांग्लादेशींच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर पुढील कालावधीत देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाईल. येथे सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT