Road Development Pudhari
पुणे

Pune Municipal Budget 2026-27: २०२६-२७ महापालिका अंदाजपत्रक – रस्ते, पदपथ व वाहतूक व्यवस्थापन

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागासाठी १८६६ कोटींची भरीव तरतूद सादर केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात शहरातील तसेच समाविष्ट 32 गावांमधील रस्ते आणि पदपथांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे, आवश्यक भूसंपादन करणे, रस्त्यांवरील चेंबरची झाकणे समपातळीत आणणे यांसह शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासोबतच समाविष्ट गावांमधील प्रत्येकी एक मुख्य रस्ता व पदपथ वर्षभरात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह एकूण 65 कि.मी. रस्ते बांधण्यात येणार आहेत. यामुळे एकूण रस्त्यात 2.5 टक्के रस्त्यांची वाढ होणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय आराखड्यात पथ विभागासाठी 1505 कोटी रुपयांची भांडवली तरतूद आणि 361 कोटी रुपयांची महसुली तरतूद अशी एकूण 1866 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही तरतूद सुमारे 500 कोटी रुपयांनी अधिक असून, पथ विभागासाठीची ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद ठरली आहे.

शहरातील सुमारे 1400 किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्यातील केवळ 32 प्रमुख रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक होत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, असे आयुक्त राम यांनी नमूद केले. अनेक रस्ते भूसंपादनाअभावी विकसित करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्राधान्यक्रमातील 32 ‌’मिसिंग लिंक‌’पैकी 12 मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादनाला गती देण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी 400 कोटी रुपये केवळ रस्त्यांसाठीच्या भूसंपादनावर खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील विद्यमान रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल करताना सर्व प्रकारच्या सेवा वाहिन्यांचा समावेश करून रस्ते विकसित केले जाणार आहेत, जेणेकरून भविष्यात पुन्हा पुन्हा खोदकामाची गरज भासणार नाही.शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून आवश्यक सुधारणा करण्यासाठी ‌’अर्बन मोबिलिटी सेल‌’ची स्थापना करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहतूक पद्धतीचा अभ्यास करून त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.

महापालिकेचा भर शहरातील रस्ते जाळे वाढविण्यावरही असणार असून, वर्षभरात सुमारे 65 किलोमीटर नव्या रस्त्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांचे जाळे सुमारे 10.75 टक्क्यांनी वाढणार आहे.

शहरातील 32 प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीवर विशेष भर दिला जाणार आहे. प्रमुख 30 चौकांचे (जंक्शन) सुशोभीकरण व विकास, रस्त्यांवरील चेंबर समपातळीत आणण्यासाठी 15 कोटी रुपये, तर पदपथांच्या दुरुस्ती व एकात्मिक विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पीपीपी तत्त्वावर विकसित होत असलेले पाच रस्ते वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

नव्या रस्ते कामांसाठी 496 कोटी

जुन्या मध्यवर्ती पुण्यात ‌‘हेरिटेज‌’ पद्धतीने रस्ते विकसित करण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. नव्या रस्ते कामांसाठी 496 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.

शहरात नवे रस्ते विकसित करण्यावर पालिकेचा भर राहील. वर्षभरात रस्त्यांचे जाळे 10.75 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 65 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे.
नवल किशोर राम, आयुक्त महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT