पुणे: तळेगाव दाभाडेपासून सात किमी अंतरावर असलेल्या इंद्रायणी नदीवरील कुंडमळा साकव पूल रविवारी (दि. 15) दुपारी सव्वातीनच्या सुमारास मधोमध तुटून कोसळला. शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांना जोडणारा या साकवाचा कुंडमळ्याच्या दिशेला असलेला पुलाचा भाग कोसळला.
सुमारे 300 मीटर लांबीच्या पुलाचा नेमका मधला 100 मीटरचा तुकडा तुटल्यानंतर तो वाहत्या नदीपात्रात कोसळला. दुर्घटनेसमयी दुचाकीवरून ये-जा करणारे दुचाकीस्वार आणि सुमारे शंभराहून अधिक पर्यटक पुलावर उभे होते. (Latest Pune News)
रविवारची सुटी असल्याने कुंडमळा या जलाशयाच्या परिसरात दोन ते अडीच हजार शहरी पर्यटकांची तोबा गर्दी झाली होती. पुलावर सुमारे दीडशे ते दोनशे पर्यटक होते. ते सेल्फी आणि फोटो काढण्यात दंग होते. इतर अनेक जण पुलाखाली तसेच तेथील ठिकठिकाणच्या वाहत्या डोहांच्या दगडांवर पाण्याच्या प्रवाहात खेळण्यात दंग होते.
पूल कोसळून मोठा आवाज झाल्यावर शेजारच्या गावकर्यांनी साकव पुलाकडे धाव घेतली. काहींनी फोन करून ही घटना ओळखीच्या लोकांना सांगितली. पोलिसांनाही खबर देण्यात आली. सोशल मीडियावरून कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेची माहिती व्हायरल झाली आणि तासाभरात नदीच्या दुतर्फा तोबा गर्दी झाली.
दरम्यान, चार वाजेपर्यंत या ठिकाणी बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सुमारे शंभराहून अधिक वाहने दाखल झाली. सगळीकडे सायरनचा आवाज करीत अॅम्ब्युलंस, अग्निशमन गाड्या, पोलिसांच्या गाड्या, एनडीआरएफची पथके आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळसह परिसरातील खासगी वैद्यकीय सेवा देणार्या वाहनांचे ताफेच्या ताफे कोसळलेल्या साकव पुलाच्या दुतर्फा पोहचले.
एक बचावला; चार कोसळले!
दुर्घटनेच्या वेळी प्रथमेश पाटील त्याच्या चार मित्रांसह पुलावर होता. मात्र, तो तुटलेल्या पुलाच्या वरच्या बाजूस असल्याने बचावला. त्याचे मित्र पुलाच्या सांगाड्याबरोबर नदीपात्रात आदळले. किरकोळ जखमी प्रथमेशला घटनेबाबत विचारले असता तो भेदरलेल्या अवस्थेत होता. तळेगाव दाभाडे येथे राहतो. मित्र कुठे आहेत माहीत नाही. सुटी होती म्हणून फिरायला आलो होतो, एवढेच तो म्हणाला.
कोणी डॉक्टर आहे का डॉक्टर?
दुर्घटनेच्या ठिकाणापासून केवळ आठ-दहा किमी अंतरावर असलेल्या एनडीआरएफ केंद्रांचे अधिकारी घटनेची खबर मिळताच तातडीने काही जखमी, बेशुध्द पर्यटकांना प्रथम नदीपात्रातून वाचलेल्या पुलावर नेण्यात आले. त्या वेळी काहींना तातडीची वैद्यकीय मदत जागेवरच देणे गरजेचे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. हा माहिती कळताच जमलेल्या लोकांमध्ये कोणी डॉक्टर आहे का डॉक्टर? असा टोहो फोडण्यात आला. त्या वेळी तीन जण डॉक्टर गर्दीतून पुढे आले. त्यांनी काही जणांना प्रथमोपचार सुरू केले.
जिवाची पर्वा न करता गावकर्यांचे मदतकार्य
सर्वप्रथम ही घटना पाहणारे आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंडमळ्यातील मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती देणार्या गावातील तरुणांनी थेट पुलाखाली अडकलेल्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. तेथील परिस्थिती अंत्यत धोकादायक होती. निसरडे दगड आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाची पर्वा न करता ते एकमेकांच्या मदतीने पूल कोसळलेल्या नदीपात्राच्या ठिकाणी पोहचले.
तेथे मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्या पर्यटकांना धीर देत जमेल तेवढ्यांना शेजारील खडकांवर पोहचविण्यास त्यांनी सुरुवात केली. कुंडमळा गावातील गणेश भेगडे, संतोष पवार, प्रशांत भेगडे, स्वामी भेगडे, सागर भेगडे, दिनेश चव्हाण, सचिन घोगरे, अतुल नाटक, राहुल राठोड, बंटी धनकुडे, संभाजी पवार, बाळू शेलार आणि रवींद्र भेगडे यांनी मदतकार्यास सुरुवात केली.
पुलाखाली पाण्यात चेंगरून अडकलेल्यांना काढण्याचे मोठे आव्हान होते. रवींद्र भेगडे यांनी या तरुणांना मार्गदर्शन करीत जमेल तेवढ्यांना पात्रातील सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम सुरू केले. पाण्यात बुडालेल्या पुलाच्या तुटलेल्या मलब्याखाली किती जण असतील आणि अनेक जण मृत पावले असल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने या तरुणांनी जिवंत असलेल्या सुमारे 15 जणांना दोरीच्या साहाय्याने खडकांवर पोहचवले.