

पुणे: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि धोरणाच्या अंमलबजावणीत प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य शासनाने मान्यता दिलेल्या प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया राज्यातील सर्व विद्यापीठांनी लवकर पूर्ण करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक नुकतीच पार पडली. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच, इतर शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. (Latest Pune News)
राज्य शासनातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील सुमारे 600 प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही महिने भरती प्रक्रिया रखडली. त्यानंतर आरक्षण बदलामुळे पुन्हा या प्रक्रियेस विलंब झाला.
त्यात पुन्हा राज्यपाल कार्यालयाने प्राध्यापक भरतीला स्थगिती दिल्याने भरतीला आणखी उशीर झाला. त्यावर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने राज्यपाल कार्यालयाशी समन्वय साधून भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली आणि अध्यादेश प्रसिद्ध करून प्राध्यापक भरती करण्यासंदर्भातील मार्ग मोकळा केला. परंतु, तरीही राज्यातील बहुतांश विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरती करण्यासंदर्भातील हालचाली होताना दिसून येत नाहीत.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती प्रक्रिया झाली नाही. काही वर्षांपूर्वी 2088 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठातील विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबविण्यात संदर्भात शासनाकडून मान्यता देण्यात आली.
त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक पात्र आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये काहीशी नवी उमेद निर्माण झाली. परंतु, अजूनही भरतीबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे पात्र उमेदवार चिंतेत आहेत. लवकरच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया रखडू शकते. त्यामुळे विद्यापीठांनी लवकरात लवकर प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.