Pune Book Festival Pudhari
पुणे

Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सवाला 7 लाखांहून अधिक नागरिकांची भेट; आज शेवटचा दिवस

वाचनसंस्कृतीचा ज्ञानोत्सव; सवलतीत पुस्तकखरेदीसाठी पुणेकरांना अखेरची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 7 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. वाचनसंस्कृती जपणाऱ्या पुणे शहरात हा महोत्सव खऱ्या अर्थाने ज्ञानोत्सव ठरत असल्याचे चित्र आहे. आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यामुळे महोत्सवाला भेट देण्यासाठी वाचकप्रेमी नागरिकांना शेवटची संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात रात्री उशिरापर्यंत गर्दी करत नागरिक विविध विषयांवरील पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. साहित्य, कादंबऱ्या, कविता, बालसाहित्य, शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच वैचारिक आणि संशोधनपर ग््रांथ यांना वाचकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. अनेक नामांकित प्रकाशकांनी दिलेल्या आकर्षक सवलतींमुळे पुस्तक प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पुस्तकखरेदी बरोबरच महोत्सवात आयोजित केलेले सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमही नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. लेखक-वाचक संवाद, कविसंमेलन, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन सोहळे तसेच विविध कला-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाला वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धी लाभली आहे. या कार्यक्रमांना तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसह आलेल्या वाचकांची मोठी उपस्थिती आहे.

एकूणच पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तकखरेदीपुरता मर्यादित न राहता, वाचन, विचार आणि संस्कृती यांचा संगम ठरत असून, रविवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली.

पुणे पुस्तक महोत्सवाने यंदा गर्दीचा उच्चांक गाठला असून, वाचकांकडून पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, सवलतीच्या दरात दर्जेदार पुस्तके खरेदी करावीत आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT