Income Tax Pudhari
पुणे

Pune Foreign Funds Case: बोगस कंपन्यांच्या नावावर परदेशात ४,४२७ कोटींचा निधी; पुण्यात दोन सीएंवर गुन्हा

कागदपत्रांची पडताळणी न करताच १३ हजार ४०४ परकीय चलन व्यवहारांना प्रमाणपत्रे; आयकर विभागाच्या तपासात धक्कादायक प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बोगस आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करताच परदेशात तब्बल ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपयांचा निधी पाठविण्यात आल्याचा आणि मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. चार आर्थिक वर्षांत परकीय चलनातील तब्बल १३ हजार ४०४ व्यवहारांना प्रमाणित करण्यात आल्याचे आयकर विभागाच्या तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरुद्ध (सीए) येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुशकुमार सुरेशचंद बगरेचा (वय ३४, रा. कुमार पृथ्वी, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (वय ३३, रा. गगन सिग्नेट, कोंढवा बुद्रुक), अशी गुन्हा दाखल झालेल्या सीएंची नावे आहेत. याप्रकरणी आयकर विभागाच्या महिला अधिकारी तन्मयी देसाई यांनी पोलिसांत तक्रार (फिर्याद) दिली आहे.

काय आहे गुन्‍हा...

परदेशात पैसे पाठवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी आयकर विभागाची काही महत्त्वाची प्रमाणपत्रे (फॉर्म १५ सीबी आणि १५ सीए) लागतात. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित कंपनीचे व्यवहार, कागदपत्रे आणि बँक खाती यांची पूर्ण तपासणी करणे सीए (चार्टर्ड अकाउंटंट) साठी बंधनकारक असते. मात्र, सीए अंकुशकुमार बगरेचा आणि मोहित तोडी यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील आपल्या कार्यालयातून कोणत्याही कागदपत्रांची किंवा खात्यांची शहानिशा न करता सर्रास खोटी प्रमाणपत्रे तयार केली आणि ती आयकर विभागाच्या संकेतस्थळावर (पोर्टल) सादर केली.

बोगस कंपन्यांचा खेळ आयकर विभागाने जेव्हा या प्रकरणाचा शोध घेतला, तेव्हा 'थॉमसन फ्रेट इंडिया', 'इमराल्ड फ्रेट' आणि 'झायलोस एअर अँड सी' या कंपन्यांच्या नावावर परदेशात पैसे पाठवण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे, जेव्हा अधिकारी या कंपन्यांच्या पत्त्यावर तपास करायला गेले तेव्हा त्या कंपन्यांचे पत्ते आणि कार्यालये बंद असल्याचे आढळले. म्हणजेच, या केवळ कागदावरच असलेल्या बोगस (शेल) कंपन्या होत्या.

देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका

वर्ष २०२२- २६ या चार वर्षांच्या काळात आरोपींनी अशाप्रकारे तब्बल १३ हजार ४०४ वेळा परदेशी चलन पाठवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे दिली. कोणत्याही व्यवहाराची पडताळणी न करता ४ हजार ४२७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम परदेशात पाठवण्यास मदत केल्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याचे आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक करंडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT