Pune BJP Tiranga Rally Pudhari
पुणे

Pune BJP Tiranga Rally: भाजपच्या तिरंगा रॅलीवरून पुण्यात राजकीय वाद; २० हजार दुचाकींमुळे वाहतूक कोंडीची भीती

११ ऑगस्टला शहरात भव्य रॅली; राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची टीका, वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

बाणेर: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी टीका केली असून, मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर आणल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बालवडकर म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना इंधनाची बचत करण्यासाठी कमीत कमी वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत. दुसरीकडे, भाजपकडूनच हजारो दुचाकींचा सहभाग असलेली रॅली आयोजित केली जात आहे.

पुणे शहर आणि परिसर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात असताना अशा प्रकारच्या रॅलीमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दुचाकींचे लक्ष्य देण्यात येत असल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला.

हजारो दुचाकी एकाच वेळी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील प्रमुख रस्त्यांवर आल्यास नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. सायंकाळच्या वेळी विविध लोकांच्या कार्यालय सुटण्याची असल्याने या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सामान्य नागरिकांना सहन करावा लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान पुणे वाहतूक पोलिसांसमोर राहणार आहे. रॅलीच्या मार्गावर वाहतूक वळविणे, नागरिकांना होणारा त्रास कमी करणे आणि आपत्कालीन सेवांना मार्ग उपलब्ध करून देणे यासाठी प्रशासनाला विशेष नियोजन करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT