Pune Municipal Election Results 2026 Pudhari
पुणे

Pune Municipal Election Results 2026: पुण्यात भाजपची मुसंडी; राष्ट्रवादी काँग्रेसचा धुराळा, काँग्रेसचे अनपेक्षित यश

फडणवीस विरुद्ध अजित पवार लढतीत भाजपचा एकहाती विजय; शिवसेना व मनसेला जोरदार धक्का

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत खरा सामना रंगला होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन मातब्बर नेत्यांमध्ये. या राजकीय कुस्तीचा फड जिंकला तो फडणवीस यांनी राजकीय डावपेचांत कसलेल्या अजितदादांवर मात करून. भाजपने गेल्या निवडणुकीतील आपल्याच कामगिरीला मागे टाकत तब्बल १२४ जागा खेचल्या. पुन्हा सत्ता मिळवण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना २५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला दहाच्या आसपासच जागा मिळण्याची शक्यता खुद्द त्याच पक्षाकडून व्यक्त होत असताना अनपेक्षितपणे आपली कामगिरी सुधारत सोळा जागांचा आकडा गाठला. दोन्ही शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आल्याने केवळ खाते खोलल्याचे समाधान मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईपाठोपाठ पुण्यातही निराशा केली. पुण्यात या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही.

महापालिकेच्या ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी निवडणूक ही झाली. त्यात भाजपने दोन जागा बिनविरोध जिंकून मतदानापूर्वीच खाते खोलले होते. उर्वरित १६३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. तसेच या दोन्ही पक्षांना निवडणुकीनंतर आघाडी करून सत्तेवर यावे लागेल, अशीही शक्यता व्यक्त होत होती. मात्र अनेक राजकीय निरीक्षकांचे हे अंदाज मतदारांनी चुकीचे ठरवत भाजपकडे एकहाती सत्ता सोपवली आहे. मोदी लाटेच्या परिणामाने २०१७ मध्ये भाजपने ९८ जागा जिंकल्या होत्या आणि नंतरच्या पोटनिवडणुकीत तो आकडा ९९ पर्यंत वाढला होता. या निवडणुकीत भाजपने आणखी सरस कामगिरी करत शंभरी ओलांडलीच, पण १२४ चा आकडाही गाठला.

राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी लाटेची थोडी झळ बसली तरी त्या पक्षाने ४१ जागा गतनिवडणुकीत जिंकल्या होत्या. या निवडणुकीत या पक्षाची कामगिरी आणखी घसरली. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्याने त्यांची ताकद कमी होईल, असे बोलले जात होते, तथापि या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या आघाडी केल्याने हा पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी निराशा केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागाच मिळू शकल्या.

काँग्रेस हा एकेकाळी सत्ता भोगलेला पक्ष असला तरी या पक्षाची कामगिरी गेल्या काही निवडणुकांत घसरतीच राहिली आहे. या पक्षाने गेल्या निवडणुकीत ११ जागाच मिळवल्या होत्या. या निवडणुकीत या पक्षाची अवस्था त्यापेक्षा खराब होईल, अशी चर्चा खुद्द त्या पक्षाच्या वर्तुळातच सुरू होती. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने १६ जागा मिळवून थोडीफार सन्मानजनक संख्या गाठली. भाजपच्या विरोधातील राजकीय शक्ती एकत्र आल्या तर भाजपविरोधात चांगली लढत देता येते, मात्र भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी झाल्याने भाजपला विजय मिळवणे सोपे गेले. काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन पक्ष यांच्यात विरोधी मते विभागली गेली. तसेच उपनगरांतील राष्ट्रवादीचा पाया भाजपने राजकीय खेळी करून हलवला. भाजपने मिळवलेले यश हे शहराच्या काही ठराविक भागांत मिळालेले यश नव्हते तर शहराच्या वेगवेगळ्या भागांतून त्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रचारातील मुद्दे आणि प्रतिसाद

महापालिकेच्या कारभारावरून अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले होते, तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारींवरून भाजपनेही राष्ट्रवादीला लक्ष्य केले. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. फडणवीस विरोधात अजितदादा असा हा सामना रंगला होता, मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत भाजपने सुरवातीपासूनच आघाडीत घेत सर्वच विरोधी पक्षांना धोबीपछाड केले. भाजपने जोरदार मुसंडी मारत रात्री उशिरापर्यंत १६५ पैकी १२३ जागा जिंकत मोठी आघाडी घेतली. दहापेक्षा अधिक प्रभागांमध्ये भाजपने सर्वच सर्व चारही जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला या तीन मतदारसंघात भाजपने अपेक्षापेक्षा अधिक जागा जिंकल्या. मात्र, शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला काही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT