Election Leadership Mohol Bidekar Pudhari
पुणे

Pune BJP Election Leadership Mohol Bidekar: मोहोळ–बिडकर जोडीवर भाजपची पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा

चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिली जबाबदारी; 125 जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी तरुण नेतृत्वाकडे धुरा, मोहोळ-बिडकर यांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची संपूर्ण धुरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच त्यावर शिक्कामोर्तब केला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची पहिली बैठक रविवारी झाली. या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ वगळता सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री पाटील यांनी महापालिकेची निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट करीत या निवडणुकीचे दैनंदिन संचलनाची जबाबदारी निवडणूक प्रमुख म्हणून बिडकर यांच्याकडे राहील, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपमध्ये तरुण नेतृत्वाकडे निवडणुकीची जबाबदारी आली आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्याकडे ही जबाबदार होती. त्यावेळेस बिडकर यांनीही या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीत भाजपने तब्बल 98 जागा जिंकून धक्का दिला होता. आता आगामी निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा जोरदार तयारी सुरू केली आहे.

पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, राज्यसभा खासदार, विधानसभेचे आठ आमदार आणि विधानपरिषद आमदार असा प्रचंड फौजफाटा आहे. महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यामुळे 125 जागा जिकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यानंतर खासदार व थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी कामकाज करणाऱ्या मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

तर त्यांच्या जोडीला अनुभवी अशा बिडकर यांच्याकडे निवडणूक प्रमुख हे पद देण्यात आले आहे. महापालिकेची प्रभागरचना भाजपसाठी अनुकूल करून घेण्यात बिडकर यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा शहराचा असलेला अभ्यास लक्षात घेऊन त्यांनाही पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मोहोळ आणि बिडकर जोडी महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT