

दत्ता भोसले
वडगाव निंबाळकर: विवाहेच्छुक वधू-वर, त्यातही खासकरून वरपक्ष आणि त्याचे कुटुंब, यांचे शोषण करण्याचा विडाच गावोगावच्या एजंट मंडळींनी उचलला आहे. एकीकडे लग्नाचे वय सरत असल्याने तणावाखाली जगत असलेल्या कुटुंबाला भावनिक आधार देत त्यांची लूट करण्याचा सपाटाच राज्यभरात विवाह एजंटांनी सुरू ठेवला आहे.
विवाह जुळणे ही समस्या एवढी जटिल झाली आहे, की यात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे. शहरांसह ग््राामीण भागातही फसवणुकीचा हा धंदा फोफावला आहे. दिवसेंदिवस या धंद्याला अधिकच तेजी येऊ लागली आहे. परंतु, मुलाचे लग्न जमावे, यासाठी पालकांची धडपड कायम राहते. अनेक वधू-वर सूचक केंद्रांकडून तसेच खासगी एजंटांकडून मोठमोठी आश्वासने दिली जातात. आम्हीच कसे लग्न जमवू शकतो, हे पटवून दिले जाते. आजवर किती विवाह जुळवले, याची खोटी-नाटी आकडेवारी सादर केली जाते. राखीव बायोडाटातून तुमचा विवाह जुळवू, असे सांगत भुरळ पाडून आर्थिक लूट केली जात आहे. त्यात दाखविलेल्या बनावट प्रोफाईल्सवर फोटो एकाचे, माहिती दुसऱ्याची असा मेळ बसवला जातो. ग््रााहक जेवढा भावनिक होईल, जेवढी जास्त गरज दाखवेल तेवढा जास्त पैसा वेगवेगळ्या पद्धतीने हडपला जातो आहे.
काही ठिकाणी तर आम्ही वधू-वरांची भेट घडवून आणतो, तुम्ही एकदा बसा, चर्चा करा, निर्णय घ्या, असे सुचविले जाते. त्यामध्ये देखील आज-उद्या कळविले जाईल, असे सांगून मानसिक आधार दिला जातो. एखाद्या हॉटेलात वगैरे भेटायचे ठरले, तर तेथील खर्चही गरजवंतांकडून वसूल केला जातो. तेथील बिल भरण्याची तयारीही अशा गरजवंताला ठेवावी लागते. ग््रााहक खूपच गरज दाखवत असेल तर आजकाल एजंटलोक सर्रासपणे बनावट स्थळे उभी करीत आहेत. त्यात काही महिला देखील त्यांच्या साथीदार असतात. अशा प्रकारांमध्ये या महिला एजंट काही मुलींना काही पैशांच्या बदल्यात वधू म्हणून पुढे आणण्याची बनावटगिरी केली जाते. समोरच्या स्थळाची थोडी माहिती अशा बनावट मुलींना देऊन आधीच पढवून ठेवले जाते. अशी स्थिती निर्माण करून, भेट घालून देण्याच्या उद्देशानेही विवाहेच्छुकांकडून हजारो रुपये एजंटांकडून उकळले जात आहेत.
काही एजंटांनी तर बनावट लोक उभे करण्याचा कहरच केला आहे. लग्न झालेल्या मुलीलाच उपवर म्हणून समोर आणले जाते. मोठी रक्कम स्वीकारून अशा मुलीचा विवाह लावला जातो. त्यानंतर सोळावा-पूजेच्या कार्यक्रमापर्यंत ही बनावट वधू सासरी नांदते. या पूजेच्या कार्यक्रमादिवशीच रातोरात घरातील दागिने, रोख रक्कम यावर हात मारून ही बनावट वधू एजंटांच्या टोळीसह पसार होत आहे. यात फसवणूक झालेल्या कुटुंबांवर अक्षरश: आभाळ कोसळते. समाजात नाव खराब होईल ही भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. परिणामी, पोलिस तक्रार टाळली जाते. लग्नसोहळ्यात झालेला लाखोंचा चुराडा, त्यानंतर घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर मारला गेलेला डल्ला, यामुळे ही हताश कुटुंबे पुढे मानसिक तणावात जगतात.
फसवणुकीबद्दल बोलताही येत नाही, अशी स्थिती
विशेष म्हणजे, अशा एजंटांवर भरवसा ठेवावा की नको, अशी द्विधा मन:स्थिती प्रत्येक कुटुंबात दिसून येते. भरवसा न ठेवावा तर लग्नच जुळणार नाही, भरवसा ठेवावा तर आर्थिक लूट ठरलेली, अशा चक्रात ही कुटुंबे अडकत आहेत. आपल्याला हा माणूस फसवेल, हे माहीत असूनदेखील आज ना उद्या लग्न जमेल, या भावनिक दबावाखाली एजंटांना पैसे दिले जातात. या पैशाचा काही हिशेब देखील लागत नाही. समाजात अशा फसवणुकीबद्दल बोलताही येत नाही.