पुणे: खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन समन्वयाने काम करण्याचा कानमंत्र दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील कथित बेबनावाची चर्चा रंगू लागली आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि काही निवडक विभागप्रमुखांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर बैठकीत चर्चा
महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी शहरातील विविध सुरू असलेले प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी थेट महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
मात्र, या बैठकीला प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनाच निमंत्रित करण्यात आले नव्हते. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि सर्वच विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नदीकाठ सुधार प्रकल्पासह दोन ते तीन महत्त्वाच्या प्रकल्पांतील अडथळे आणि प्रलंबित निर्णयांबाबत चर्चा झाली. मात्र, इतक्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक बैठकीत महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना विश्वासात न घेता बाजूला ठेवण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा कोणत्याही बैठकीची आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे बैठकीची पूर्वकल्पना नेमकी कोणाला होती आणि महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना बैठकीपासून दूर का ठेवण्यात आले, याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. तर महापौर मंजूषा नागपुरे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.