Dhiraj Ghate Pudhari
पुणे

Pune Affordable Housing: परवडणारी घरे देण्याचा भाजपाचा निर्धार; पुढील पाच वर्षांत २५ हजार घरे बांधणार

पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार, मालमत्ता करमाफीसह पुणेकरांच्या हक्काच्या घरावर भाजपाचा भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‌‘प्रचंड वेगाने वाढणाऱ्या पुण्यात सर्वसामान्य पुणेकरांना स्वतःचे घर हवे आहे. तेही परवडणाऱ्या, स्वस्त दरात. पुणेकरांचे हे स्वप्न भारतीय जनता पार्टीच पूर्ण करू शकते. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान आवास योजनेच्या सहा प्रकल्पातून भाजपाने हजारो पुणेकरांचे घराचे स्वप्न सत्यात उतरवले. पुढच्या पाच वर्षात या दिशेने आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत,‌’ असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

‌‘देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत या देशातल्या मध्यमवर्गीय, सामान्य आणि बेघर नागरिकांच्या घराचा विचार कोणीही केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली. त्यातून थेट अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान घरासाठी दिले. यातून लोकांना परवडणारी, स्वस्त घरं मिळू लागली. या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल,‌’ असे घाटे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘पुढारी‌’ने घाटे यांच्याशी संवाद साधला.

तेव्हा ते बोलत होते. ‌‘नुसते घर देऊन भाजपा थांबणार नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून घरामध्ये वीज, पाणी, शौचालय आणि पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस देखील देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी घर असणाऱ्या आर्थिक दुर्बल कुटुंबाचा मालमत्ता कर माफ करण्याचाही संकल्प आम्ही केला आहे. सहकारी गृहरचना संस्थांच्या समस्या अल्पावधीत सोडवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार आहोत,‌’ असे घाटे यांनी स्पष्ट केले.

घाटे म्हणाले की, मध्यंतरी लोकमान्य नगरातील पुनर्विकासाच्या मुद्यावरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच स्पष्ट केले की, कुठलाही पुनर्विकास स्थानिकांना डावलून होणार नाही. स्थानिक रहिवाशांच्या मतानुसारच पुनर्विकास होईल. शहरातील जुन्या वास्तू, वारसा स्थळांच्या अवतीभोवतीची जुनी बांधकामे यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न आहेत. या सगळ्यावर स्थानिकांना विश्वासात घेऊन महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून मार्ग काढणार आहे.

हक्काच्या घराचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यास भाजपाचे प्राधान्य असेल. येत्या पाच वर्षात 25 हजारांहून अधिक घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. ही घरे महापालिकेच्या जागेवर बांधणार असल्याने सर्वसामान्य पुणेकरांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. शिवाय, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रत्येकी अडीच लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाचाही लाभ मिळेल.
धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT