पुणे : भिडे पुलावरील वाहतूक मेट्रोच्या कामासाठी काही काळ बंद ठेवण्यास वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, या परवानगीमध्ये पुलावरील वाहतूक सायंकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत सुरू ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, या आदेशाला मेट्रोने केराची टोपली दाखवली आहे. हा पूल 5 नंतर देखील मेट्रोकडून बंद ठेवला जात आहे. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस मोठे फलक लावावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे केली आहे.(Latest Pune News)
वेलणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यास वाहतूक विभागाने मेट्रोला 15 डिसेंबर 2025 पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना मेट्रोलाच सायंकाळी 5 ते 11 या वेळेत पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मात्र, याकडे मेट्रोने दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता 5 नंतरदेखील बंद ठेवला जात आहे. नागरिकांना याबाबत माहिती नाही. ही माहिती त्यांना कळावी यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी कोणत्या वेळात पूल बंद आहे आणि कोणत्या वेळात पूल सुरू आहे याबाबत मोठे फलक लावणे आवश्यक आहे.
या पुलावरील वाहतूक बंदीचे नियोजन करताना पुणे महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि मेट्रो प्रशासनाने संयुक्तरीत्या निर्णय घेतला असता तर अधिक योग्य झाले असते. मेट्रोच्या कामाचा वेग अत्यंत संथ असून, “तो कासवाला सुद्धा लाजवेल असा आहे,” अशी टीका देखील वेलणकर यांनी केली आहे. वेलणकर यांनी सोमवारी या पुलावर प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ काही मोजके मजूर काम करताना दिसले. अशा गतीने काम चालले, तर हे काम किती लांबेल याची कल्पनाच नाही.
त्यामुळे वाहतूक पोलिस, महापालिका आणि मेट्रो प्रशासन यांची संयुक्त आढावा समिती तातडीने नेमणे अत्यावश्यक आहे. ही समिती दर पंधरवड्याने कामाचा आढावा घेईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. जर मेट्रो प्रशासनाने 15 डिसेंबरनंतरही परवानगी वाढवून मागितली, तर त्यांना फक्त रात्रीच्या वेळीच कामाची परवानगी द्यावी. नागरिकांचा संयम आणि त्रास लक्षात घेऊन कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी देखील त्यांनी केली.