पुणे: भिडे पूल परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदीच्या दोन्ही काठांवरून शेकडो ट्रकभर माती व राडारोडा टाकल्यामुळे पुलाजवळील मोऱ्या जवळपास बंद होण्याच्या स्थितीत आल्या आहेत. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन बहिरट आणि बाबा सय्यद म्हणाले की, येत्या पावसाळ्यात या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे पुराचा धोका अधिक वाढू शकतो. आधीच अल्पावधीत होणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय होत असताना नदीपात्र अरुंद करण्याचे काम अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
42 कि.मी. नदीपात्रात राडारोडा; पुराचा धोका
तब्बल 42 किलोमीटर नदीपात्रात राडारोडा टाकून सुरू असलेला नदी सुधार प्रकल्प प्रत्यक्षात पुराला आमंत्रण देणारा ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यात यामुळे जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘नदीसुधार की प्रशासनसुधार?’ असा सवाल उपस्थित करीत नागरिकांनी या प्रकल्पाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, नदीपात्रातील अडथळे त्वरित दूर करून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.