Rice Pudhari
पुणे

Basmati Rice Price Increase: बासमती तांदळाचे दर वाढले; जागतिक मागणीचा परिणाम

गहू-मसाले महाग, साखरेत दिलासा; किराणा बाजारात दरांमध्ये चढ-उतार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील बासमती तांदळाला सध्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मध्यपूर्व देशांसह अनेक परदेशी बाजारपेठांमधून मागणी वाढल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे सुमारे 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, काही भागांमध्ये गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सहज शिजणाऱ्या अन्नाला प्राधान्य दिले जात असल्यानेही बासमती तांदळाचा वापर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय जागतिक स्तरावर उद्भवलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे अन्नधान्य साठवण्याकडे अनेक देशांचा कल वाढला असून, त्याचा थेट परिणाम बासमतीच्या मागणीवर दिसून येत आहे.

गहू आणि ज्वारीच्या बाजारातही चांगल्या प्रतीच्या मालाला मागणी वाढली आहे. उच्च प्रतीच्या गव्हाच्या दरात किलोमागे 1 ते 1.50 रुपयाची वाढ झाली आहे. मात्र, ज्वारी आणि बाजरीचे दर स्थिर असून, मागील आठवड्याप्रमाणेच व्यवहार सुरू आहेत. ग्रामीण भागातून पुरवठा सुरळीत असल्याने या धान्यांच्या दरात मोठी हालचाल झालेली नाही. साखरेच्या बाजारात मात्र किंचित दिलासा मिळाला आहे. साखरेच्या दरात क्विंटलमागे 20 ते 25 रुपयांनी घट झाली आहे. मात्र, साखरेची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा दिलासा तात्पुरता ठरू शकतो.

मसाल्यांच्या बाजारात लाल मिरची आणि धने यांच्या दरात वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या दरात किलोमागे 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. तर, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने धनेदरात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ नोंदवली गेली असून, किलोमागे 10 ते 15 रुपयांनी दर वाढले आहेत. यामुळे किराणा व्यापाऱ्यांसह ग्राहकांवरही अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. गोटा खोबऱ्याच्या दरात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. हवामानातील बदलामुळे खोबऱ्याचा दर्जा खालावणे आणि साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे पुरवठा घटला आहे. परिणामी, गोटा खोबरे दरात किलोमागे सुमारे 40 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान शेंगदाणे, खाद्यतेल, विविध डाळी, कडधान्ये, साबूदाणा, भगर आणि नारळ यांच्या दरात मात्र स्थिरता आहे. या वस्तूंच्या पुरवठ्यात कोणताही मोठा अडथळा नसल्याने दर कायम असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 4050-4070 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2670-2850, रिफाइंड तेल 2300-3000, सरकी तेल 2150-2550, सोयाबीन तेल 2250-2550, पामतेल 2300-2450, सूर्यफूल रिफाइंड तेल 2400-2600, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1850-2300 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4150-5000, एच. एम. टी. कोलम 5200-5500, लचकारी कोलम 6000-6500, चिन्नोर 4500-5000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 7000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु.

ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु. गूळ :- गूळ नं. 1 4600-4750, गूळ नं.2 4300-4450 गूळ नं.3 4150-4250, बॉक्स 4300-5500 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7650-7800, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:-हरभरा 6000-6500, हुलगा 5200-5700, चवळी 7900-10500, मसूर 7400-8400, मूग 9500-9800, मटकी गावरान 9500-16000, मटकी पॉलिश 6800-7700, मटकी गुजरात 14000-16000, मटकी राजस्थान 6500-7500, मटकी सेलम 16000-17700, वाटाणा हिरवा 5600-6000, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु. साबुदाणा : साबूदाणा नं. 1-6200, साबूदाणा नं. 2-5800, साबूदाणा नं.3-5600 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT