पुणे

पुणे बार असोसिएशन निवडणूक: ‘त्या’ इच्छुकाने धनादेश थांबविला

Laxman Dhenge

पुणे : पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने तात्पुरत्या सभासदांच्या वार्षिक शुल्कापोटी नोंदणी अधिकार्‍याकडे सादर केलेला 3 लाख 33 हजार रुपयांचा धनादेश बँकेत वटलाच गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. 'त्या साडेसहा लाखांची कोर्टात चर्चा' या मथळ्याखाली दै. 'पुढारी'त बातमी प्रकाशित झाल्यानंतर संबंधित उमेदवारांने बँकेशी तत्काळ संपर्क करत धनादेशातील पैशांची पूर्तता न करण्याचे आदेश बँकेला दिले. धनादेश दिलेल्या उमेदवाराचे पैसे वाचविल्याचे कळताच आरटीजीएसद्वारे पैसे पाठविणार्‍या उमेदवारानेही पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची चर्चा न्यायालयात आहे.

बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक येत्या जानेवारी महिन्यात पार पडत आहे. निवडणुकांसाठी मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारापैकी एकाने धनादेश तर दुसर्‍याने आरटीजीएसद्वारे तात्पुरत्या सभासदांची रक्कम नोंदणी अधिकार्‍याकडे सादर केली. याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'त प्रकाशित होताच पुणे बार असोसिएशनच्या बैठकीतही रक्कम स्वीकारण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.

आपण सादर केलेला धनादेश वटला गेला तर पैसे पुणे बार असोसिएशनच्या खात्यात जातील. दरम्यान, बार असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे निवडणुकीत त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे लक्षात येताच संबंधित उमेदवाराने बँकेशी संपर्क करत धनादेश न वटविण्याचा आदेश बँकेला देत 3 लाख 33 हजारांची रक्कम आपल्या खात्यातून जाण्यापासून थांबविली. दुसरीकडे आरटीजीएसद्वारे पैशांचा भरणा करणार्‍या उमेदवाराचे पैसे तत्काळ असोसिएशनच्या खात्यावर जमा झाले होते. त्यामुळे, संबंधित उमेदवाराने पैसे परत मिळविण्याच्या दृष्टीने बारकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती न्यायालयातील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

बार असोसिएशनकडे जमा करण्यात आलेला धनादेश न वटल्याबाबत कोणतीही माहिती नाही. याबाबत, बँकेकडून खात्याचे विवरणपत्र मागविण्यात येईल. त्यानंतर या प्रकारावर बोलणे उचित ठरेल.

अ‍ॅड. केतन कोठावळे अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT