पुणे

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या हरित प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळुरू हरित महामार्गाच्या (ग्रीनफिल्ड कॉरिडॉर) प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबतचा अहवाल लवकरच अंतिम करून केंद्राला सादर केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) हे काम करण्यात येत आहे. देशातील निवडक शहरे, महानगरांना जोडण्यासाठी 'भारतमाला' प्रकल्पांतर्गत सुमारे तीन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे.

त्यामध्ये पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. सध्याचा पुणे-बंगळुरू महामार्ग 838 किलोमीटरचा आहे. नवा हरित महामार्ग 745 किलोमीटरचा असणार आहे. त्यामुळे पुणे आणि बंगळुरू महानगरे आणखी जवळ येणार आहेत. सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्च या महामार्गासाठी येणार आहे. हा महामार्ग आठपदरी असणार असून, ताशी 120 कि.मी. वेगाने या महामार्गावरून जाता येणे शक्य आहे. हा पूर्णपणे नवा द्रुतगती महामार्ग आहे.

वरवे बुद्रुकपासून हा महामार्ग सुरू होणार आहे. या महामार्गावर सहा मार्गिका प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्ग लक्षात घेता हा महामार्ग संपूर्णतः डांबरी असणार आहे. हा मार्ग पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट न जाता पथकर नाक्यांपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक पी. डी. कदम यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT