शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांनी जीवन संपवल्‍याने खळबळ | पुढारी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांनी जीवन संपवल्‍याने खळबळ

घाटकोपर ; पुढारी वृत्‍तसेवा घाटकोपर मधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नाव असलेले माजी विभाग प्रमुख, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकल खाली जीवन संपवल्‍याने खळबळ उडाली आहे.

जीवन संपवल्‍याचे कारण मात्र स्पष्ट नाही…

गुरुवार दि ३१ रोजी रात्री ते अचानक फोन आल्यावर घराबाहेर पडले. गाडी आणि सुरक्षा रक्षक यांना ही सोबत घेतले नाही. आपण कमानिमित्त जात असल्याचे सांगून ते निघाले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली ते गेले. तिथे ११.३० च्या दरम्यान ट्रॅकवर झोपले. कल्याण वरुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटर मॅनने त्यांना पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्न ही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरून गेली आणि त्‍यांचा जागीच मृत्यू झाला.

मोटर मॅनने याची माहिती पोलीसांना दिली असून, तसा जबाब नोंदविला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जीवन संपवल्‍याचे कारण अजून स्पष्ट नसून, पुढील तपास कुर्ला लोहमार्ग पोलीस करीत आहेत. मात्र मोरे यांना कोणी ब्लॅकमेल वैगरे करीत होते का? असा सवाल विचारला जात आहे. सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते. ते आणि त्यांच्या भावाची पत्नी शिवसेनेत माजी नगरसेवक होते.

आमदार राम कदम यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक ही लढवली होती. त्यांच्या अचानक जीवन संपवण्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यविधी होणार असून, शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते उपस्थित असतील.

Back to top button