मोहसीन शेख
बाणेर: गेल्या अनेक वर्षांपासून बाणेर येथे रखडलेल्या ननवरे चौक ते पॅन कार्ड क्लब रस्त्याच्या कामाला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत सुरुवात झाल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच हे काम सुरू केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) माजी नगरसेवकांनी देखील तेथूनच या कामाला सुरुवात केली.
एकंदरीत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून हे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Latest Pune News)
कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी परिसरातील मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत विकास आराखड्यातील अपूर्ण रस्ते पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या रस्त्यांबाबत महापालिका आयुक्तांनी जागा मालक अविनाश मुरकुटे आणि बांधकाम व्यावसायिकासोबत नुकतेच बैठकीचे आयोजन केले होते. राज्य सरकारने ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांसाठी सुमारे दीडशे कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. या अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, बाणेर येथील ननवरे बिज येथील 24 मीटर डीपी रस्ता पूर्ण झाल्यानंतर बिटवाईज चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग््रेासने या संदर्भात स्थानिक सोसायट्यांच्या वतीने गेल्या 17 मे रोजी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार 8 जुलै रोजी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली.
त्यानंतर 12 जुलै रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. या पाठपुराव्यानंतर अखेर ननवरे चौकातील प्रलंबित रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हे काम सुरू करण्यासाठी महापालिकेला निवेदन दिल्याचे मनसेनेच्याही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे पुढील काळात या कामाचे श्रेय जनता नेमके कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेकडून अद्याप वर्क ऑर्डर नाही
या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले असून, त्यांनी आपापल्या परीने या कामाला सुरुवात केली आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून या कामाची अद्याप वर्क ऑर्डर निघाली नाही. काही ठेकेदारांना हाताशी धरून राजकीय पक्षांकडून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.