पुणे: कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन आणि बालनाट्यगृहाचा प्रकल्प १२ वर्षे उलटूनही रखडला आहे. त्यात आणखी ६८.९५ लाख रुपयांच्या म्युरल (भित्तिचित्र) कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मूलतः सुमारे सात कोटी रुपयांत उभारण्यात येणारा हा प्रकल्प आता जवळपास २० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असून, तरीही उद्घाटनाची तारीख निश्चित नसल्याने कलाकार आणि रसिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत बालनाट्यगृहातील म्युरल आणि कलात्मक सजावटीच्या कामासाठी ६८.९५ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातील एसी यंत्रणा बसवण्यासाठीही निविदा प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे मूळ बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विविध पूरक कामांना मंजुरी दिली जात असल्याने प्रकल्पाच्या विलंबावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, म्युरल आणि कलात्मक सजावटीमुळे बालनाट्यगृहाचे अंतर्गत सौंदर्य अधिक आकर्षक होईल तसेच ही सांस्कृतिक वास्तू अधिक दर्जेदार स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध होईल. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या कामांमुळे बालनाट्यगृहाचे सांस्कृतिक महत्त्व आणि आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, प्रत्यक्षात गेल्या एक तपाहून अधिक काळापासून हा प्रकल्प अपूर्णच आहे. या कालावधीत खर्च सातत्याने वाढत गेला, पण नाट्यगृह, बालनाट्यगृह आणि कलादालन अद्याप नागरिकांसाठी खुले झालेले नाही. परिणामी कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि रसिकांना या वास्तूच्या प्रतीक्षेतच राहावे लागत आहे.
दिरंगाईबाबतचा आढावा घेतला जाईल
या प्रकल्पाला एवढा विलंब का झाला, आतापर्यंत किती खर्च झाला, कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती प्रलंबित आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण आढावा घेतला जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. या पाहणीनंतर दिरंगाईची कारणे आणि पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.