पुणे: मुलांना वाचन संस्कृतीसोबतच कला आणि पारंपरिक खेळांची ओळख करून देणाऱ्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’ला चार दिवसांत सुमारे 40 हजार मुलांनी आपल्या पालकांसमवेत भेट दिली. या जत्रेत मुलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे (एआय) नव तंत्रज्ञान, कुतूहल निर्माण करणारी वैज्ञानिक पुस्तके, थोर व्यक्तींची चरित्रे, मूल्यशिक्षण देणारी गोष्टींची पुस्तके खरेदीवर आवर्जून भर दिला.
पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणेच्या वतीने 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे जत्रेचे आयोजन केले होते. या जत्रेत मुलांसाठी 100 पुस्तकांची दालने होती.
जत्रेचा समारोप सोमवारी सायंकाळी बालगीतरामायण या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने झाला. प्राजक्ता जहागीरदार आणि 40 मुलांच्या समूहाने हे सादरीकरण केले. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, डॉ. संजय चाकणे, संवाद पुणेचे सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, अर्चना सोनवणे आदी उपस्थित होते. जत्रेत 90 हजार पुस्तकांची विक्री झाल्याची माहिती राजेश पांडे आणि सुनील महाजन यांनी दिली.
स्क्रीन टाईम कमी करण्याबाबत मार्गदर्शन
सोमवारी जत्रेत ‘मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी कराल’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. श्रुती पानसे आणि स्मिता पाटील वळसंगकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत स्क्रीनच्या अतिवापराचे धोके आणि पर्यायी उपायांवर प्रकाश टाकला.
तसेच, मोहिनी भुसे यांचे संबळवादन आणि एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गोंधळाच्या कार्यक्रमाने मने जिंकली.