Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Bal Gandharva Award: बालगंधर्व पुरस्कार रखडले; 2020-21 चे सन्मान अजूनही प्रलंबित

पाच वर्षांनंतरही पुरस्कार वितरण नाही; कलाकारांकडून नाराजी, यंदा कार्यक्रम होणार का?

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांना 2020 आणि गायिका डॉ. रेवा नातू यांना 2021 चा ‌‘बालगंधर्व पुरस्कार‌’ जाहीर होऊन पाच वर्षे उलटली; मात्र 2026 साल उजाळले तरी हे पुरस्कार अद्याप प्रदान करण्यात आलेले नाहीत. कोरोना काळ, मग प्रशासकाची नियुक्ती आणि त्यानंतर महापालिका निवडणूक, या कारणांमुळे पुरस्कार वितरण लांबत राहिले.

त्यानंतर नवीन पुरस्कारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. यावर्षी तरी या पुरस्कारांच्या वितरणाला मुहूर्त लागणार आहे का? असा सवाल कलाक्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यंदा बालगंधर्व पुरस्कारांसह महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्पष्ट केले आहे.

नटसमाट बालगंधर्व यांच्या 26 जून रोजी असलेल्या जन्म दिनानिमित्त दरवर्षी पुणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ कलाकारास बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कार केला जातो. तसेच महापालिकेकडून इतर विविध पुरस्कारही दिले जातात. 2020 आणि 2021 या दोन वर्षांचे पुरस्कार निर्मला गोगटे आणि डॉ. रेवा नातू यांना देण्याची घोषणा तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती.

मात्र, 2021 मध्ये कोरोनामुळे हे पुरस्कार पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण झाले नाही. तसेच, नवीन पुरस्कारांची घोषणाही झाली नाही. पुरस्कार जाहीर करून 2026 उजाडले तरी असले तरी जाहीर झालेल्या पुरस्कारांच्या वितरणाला मुहूर्त मिळालेला नाही. लवकरात लवकर हे पुरस्कार प्रदान करण्यात यावे, अशी मागणी कलाकारांकडून केली जात आहे. याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या, यावर्षी पुरस्कार प्रदान करण्याचे नियोजन आहे. याबाबात महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार पुरस्कार प्रदान करण्यासंबंधी नियोजन करणार आहोत

यंदाच्या वर्षी बालगंधर्व पुरस्कारांसह महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाईल, त्याबाबतच्या सूचना लवकरच देण्यात येणार आहेत.
मंजूषा नागपुरे, महापौर
तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्र आले होते. मात्र, काही कारणामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. पुरस्कार जाहीर झाला. पण, प्रदान केला नाही, याची थोडीशी खंत वाटते.
डॉ. रेवा नातू, गायिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT