पुणे: लिव्ह अँड लायसन्स करार संपल्यानंतरही इमारतीचा ताबा न सोडता, 'जागा परत हवी असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाहीतर मालमत्ता विसरून जा. गरज पडली तर इमारतही पेटवून देऊ,' अशी थेट धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार औंधमध्ये उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दोघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सत्यप्रकाश शंभू पोद्दार (वय ४७, रा. सूस) आणि प्रदीप शंभू पोद्दार (वय ४२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत व्यावसायिक महेंद्र संपतराव गोडगे (वय ४९, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सेनापती बापट रोडवरील सनराईज अपार्टमेंटमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोडगे यांनी औंधमधील रिट्रीट परिसरातील हॅपिलेस्ट अपार्टमेंटमधील इमारत आरोपी सत्यप्रकाश शंभू पोद्दार याला लिव्ह अँड लायसन्स कराराने वापरण्यास दिली होती. ३० जून २०२१ पर्यंत कराराची मुदत होती. कराराची मुदत संपूनही आरोपीने इमारत रिकामी केली नाही.
उलट अनेक महिन्यांपासून भाडेही न भरता इमारतीवर बेकायदेशीर ताबा कायम ठेवल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीचा भाऊ प्रदीप पोद्दार हा फिर्यादीच्या कार्यालयात पोहचला. त्या वेळी त्याने 'इमारत परत देणार नाही, इमारत परत हवी असेल तर सेटलमेंट करा,' असे म्हटले. त्याने आपल्या भावाला फोन लावून दिला. त्याने फिर्यादींना फोनवरून दोन कोटी रुपये द्या, नाहीतर मालमत्ता विसरून जा. इमारत आम्ही सोडणार नाही. काय करायचे ते करा. आमचे अनेक गुन्हेगार टोळ्यांशी संबंध आहेत. गरज पडली तर मालमत्ता पेटवून देऊ,' अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एवढ्यावरच न थांबता दोन कोटी रुपयांची मागणी मान्य केली नाही, तर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे घाबरलेल्या फिर्यादीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.