Amenity Space Development Pudhari
पुणे

Pune Amenity Space Development: पुण्यात ॲमिनिटी स्पेसवर उद्याने विकसित करण्याचा प्रस्ताव; हरित क्षेत्र वाढवण्यावर भर

शहरातील मोकळ्या जागांचा वापर सार्वजनिक उद्याने व हरित पट्ट्यांसाठी करण्याची महापालिकेची योजना; यूडीपीसीआर बदलांनंतर नवीन दिशा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाढते नागरीकरण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता महापालिकेच्या ताब्यातील मोठ्या ॲमिनिटी स्पेसवर सार्वजनिक उद्याने आणि विकसित करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत असून, महापालिकेच्या माध्यमातून यासंबंधीचा प्रस्ताव मांडला असल्याचे सांगण्यात आले.

राज्याच्या ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीपीसीआर) मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे बांधकाम प्रकल्पांकडून सार्वजनिक सुविधांसाठी मिळणाऱ्या ॲमिनिटी स्पेसमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसमोर भविष्यात शाळा, क्रीडांगणे, दवाखाने आणि उद्याने उभारण्यासाठी आवश्यक जागांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मोठ्या ॲमिनिटी स्पेसवर इतर बांधकामांना परवानगी न देता तेथे सार्वजनिक उद्याने आणि हरित पट्टे विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शहरातील नागरिकांना अधिकाधिक मोकळ्या आणि हिरव्यागार जागा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे समजते.

यूडीपीसीआरमधील बदलांमुळे ॲमिनिटी स्पेसमध्ये घट

यूडीपीसीआर लागू करताना सुरुवातीला ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांसाठी ५ ते १० टक्के ॲमिनिटी स्पेस राखीव ठेवण्याची अट होती. मात्र, नियमावली प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यात बदल करण्यात आला. सुधारित नियमांनुसार २० हजार चौरस मीटरपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ॲमिनिटी स्पेसची अट पूर्णपणे हटविण्यात आली, तर त्यापेक्षा मोठ्या प्रकल्पांसाठी ती केवळ ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली. महापालिकेने २०१७ च्या विकास नियमावलीनुसार ॲमिनिटी स्पेसची जुनी तरतूद कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, नगरविकास विभागाने हा प्रस्ताव फेटाळला. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांवर झाला आहे.

हरित क्षेत्र वाढवण्यासाठी स्वतंत्र मोहीम

उपलब्ध ॲमिनिटी स्पेसचा वापर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने स्वतंत्र मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. महापालिकेकडून यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, राज्य सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT