पुणे: पुणे विमानतळाला विंग्स इंडिया 2026 या प्रतिष्ठित नागरी विमान वाहतूक परिषदेत ‘बेस्ट एअरपोर्ट’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात मिळालेला हा सन्मान पुणे विमानतळाच्या कार्यक्षमतेच्या आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
हा पुरस्कार नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम संचालन, मजबूत सुरक्षा मानके, प्रवासी सुविधा सुधारणा आणि उच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी पुणे विमानतळाने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही दखल आहे, असे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
ढोके म्हणाले, पुणे हे उद्योग, शिक्षण आणि नवोपक्रमाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत असताना विमानतळाची भूमिका कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात आणि आर्थिक विकासाला चालना देण्यात अत्यंत महत्त्वाची आहे. हा पुरस्कार आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधा उभारण्याच्या, प्रवासी अनुभव अधिक सक्षम करण्याच्या आणि भारताला जागतिक विमानवाहतूक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनर्रचना करतो. या उल्लेखनीय यशासाठी पुणे विमानतळाशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन करतो.