विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका Pudhari
पुणे

Pune Airport CPR Rescue: विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने दिले जीवदान

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरील प्रसंग; सीपीआरच्या तातडीच्या उपचारामुळे वाचला ज्येष्ठ प्रवाशाचा जीव

पुढारी वृत्तसेवा

पुणे : दिवस दिवाळी काळातला... विमानतळावर प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांची गर्दी नेहमीपेक्षा जास्तच होती... गर्दी नियंत्रणासाठी विमानतळ अधिकारी, कर्मचारी, विमान कंपन्यांची धावपळ सुरू होती अन् इतक्यातच एक ज्येष्ठ प्रवासी विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये कोसळला. हा प्रवासी विमानाने बाहेरून पुणे पुण्यात आला होता. ही घटना पाहताच विमानतळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत (प्रथमोपचार) द्यायला सुरुवात केली. उपचार मिळाल्याने प्रवासी शुद्धीवर आला अन्‌‍ त्याचे प्राण वाचविण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले.(Latest Pune News)

दिवाळी काळात पुणे विमानतळावर प्रवासासाठी आलेला एक प्रवासी नुकतेच नव्याने सुरू केलेल्या टर्मिनलमध्ये अचानकच पडला. ही घटना पाहताच येथील कर्मचारी, सीआयएसएफ जवान मदतीला धावले. त्या व्यक्तीची अवस्था पाहताच त्यांना या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव झटका आल्याचे निदर्शनास आले. सीआयएसएफ जवानाने आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण मिळाल्याप्रमाणे तत्काळ त्या व्यक्तीला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) दिला.

सीपीआर केल्याने व्यक्तीच्या जगण्याची शक्यता वाढली, अन्‌‍ त्याला त्वरित प्रथमोपचार मिळाला. हृदय आणि मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा चालू ठेवण्यासाठी या वेळी सीपीआर महत्त्वाचा ठरला. दरम्यान, त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने विमानतळ प्रशासनाकडील कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी या रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले, सीपीआरसारखा प्रथमोपचार या व्यक्तीला तातडीने व वेळेत मिळाल्यामुळेच या व्यक्तीचे प्राण वाचल्याचे सांगितले अन्‌‍ त्यांनी हृदयविकारासंदर्भातील पुढील उपचार रुग्णालयात केले.

सीपीआर म्हणजे काय?

कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) म्हणजे हृदय आणि फुप्फुसे पुनरुज्जीवित करण्याची आपत्कालीन प्रक्रिया होय. मराठीत याला हृदय-फुप्फुस पुनरुज्जीवन असे म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय धडधडणे थांबते किंवा श्वास घेणे थांबते, तेव्हा मेंदू आणि महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्ताभिसरण चालू ठेवण्यासाठी सीपीआर केले जाते, यामुळे व्यक्तीचे प्राण वाचविता येते. याच प्रक्रियेमुळे पुणे विमानतळावर एका प्रवाशाचे प्राण वाचविण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले आहे.

दिवाळी काळात माझ्यासह आमच्याकडील कर्मचारी, सीआयएफ जवान आणि विमान कंपन्यांचे कर्मचारी नवीन टर्मिनलवर दैनंदिन काम करत होतो. त्यावेळी एका प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. ही गोष्ट लक्षात येताच, त्याला तातडीचा प्रथमोपचार म्हणून सीपीआर देण्यात आला. सीपीआर देण्यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही प्रशिक्षण दिले होते. याच प्रशिक्षणाचा फायदा आम्हाला एका प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी झाला. याचा आम्हाला अभिमान आहे. वेळेत सीपीआर दिल्यानेच व्यक्तीचे प्राण वाचल्याचेही डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव दक्ष असतो.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT