पुणे: गेल्या १२ वर्षांत विमानतळावरील प्रवासी वाहतुकीने नवा उच्चांक गाठला आहे. सन २०१४ मधील वार्षिक ४४.६ लाख प्रवाशांवरून ही संख्या आता २०२६ मध्ये १.१३ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. यासोबतच वार्षिक विमानांची आवगमन संख्या ३५ हजारांवरून थेट ६९ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. विमानतळावरील मालवाहू सेवांच्या विस्तारामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादन, अभियांत्रिकी, कृषी आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
सोमवारी (दि.१५ जून) साजरा होणाऱ्या विमान प्रवासी सुविधा दिनाच्या पार्श्वभुमीवर दै.'पुढारी'ने पुणे विमानतळावरील बदलत असलेल्या प्रवासी सुविधांसह अन्य सुविधांच्या कामाचा आढावा घेतला. गेल्या १२ वर्षांत पुणे विमानतळाने फक्त प्रवासी संख्येतच नव्हे, तर विमानोड्डाणे, प्रवासी सेवा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या वापरात प्रगती केल्याचे दिसून आले. विमानतळावर अनेक प्रगत सुविधा सुरू केल्या.
यात प्रशस्त चेक-इन क्षेत्र, विस्तारित सुरक्षा तपासणी झोन, आधुनिक बॅगेज हँडलिंग सिस्टीम आणि पॅसेंजर बोर्डिंग ब्रिजेस यांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पुणे विमानतळाने डिजीयात्रा प्रणाली यशस्वीपणे लागू केली आहे. यामुळे प्रवाशांना कागदपत्र विरहित आणि विनास्पर्श सुरक्षा तपासणीचा अनुभव मिळत असून, त्यांचा वेळ वाचत आहे.
प्रवासी-स्नेही उपक्रम
सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करून विमानतळावर परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ देणारे 'उडान यात्री कॅफे' लहान मुलांसाठी खास खेळाची जागा आणि अद्ययावत वेटिंग लाउंज सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गरजू प्रवाशांसाठी विमानतळाने आपली पायाभूत सुलभता अधिक मजबूत केली असून, सर्वांना समान व सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विमानतळाची प्रवासीसंख्यावाढी प्रवास हा फक्त संख्यात्मक विकास नसून, आमच्या अविरत प्रवासी-सेवांचा सन्मान आहे. डिजीयात्रासारख्या डिजिटल प्रणाली, आधुनिक एकात्मिक टर्मिनल, दर्जेदार उडाण यात्री कॅफे आणि ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी उपलब्ध केलेल्या विशेष सुविधांमुळे पुणे विमानतळ आता जागतिक दर्जाचे बनले आहे. या यशाचे खरे मानकरी आमचे प्रवासी, विमान कंपन्या आणि विमानतळावरील सर्व कर्मचारी आहेत. प्रवाशांना अत्यंत सुरक्षित, सुलभ आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ