Plane Pudhari
पुणे

Pune Airport Monsoon Preparation: पुणे विमानतळावर मान्सूनपूर्व तयारी पूर्ण; पावसाळ्यातही उड्डाणे सुरळीत राहणार

रनवे ड्रेनेज, इलेक्ट्रिकल यंत्रणा आणि आपत्कालीन पथकांची 24 तास तयारी; प्रवाशांसाठी सूचना जारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ​पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांचे उड्डाण सुरक्षित आणि विनाअडथळा सुरू राहण्यासाठी सर्वंकष मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात विमान उड्डाणे विनाअडथळा होतील, असा विश्वास विमानतळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी गाळ काढण्याची कामे पूर्ण

​पावसाळ्यात रनवे (धावपट्टी) आणि परिसरात पाणी साचू नये, यासाठी विमानतळावरील पर्जन्य जलवाहिन्या (स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन्स), कल्व्हर्ट्स, एप्रन आणि इतर परिचालन क्षेत्रांची सविस्तर तपासणी आणि स्वच्छता करण्यात आली आहे.

पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच धावपट्टीच्या परिसरातील वाढलेले गवत आणि वनस्पती काढून टाकल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यात वन्यजीव किंवा पक्ष्यांचा विमानांना होणारा धोका कमी करता येईल.

इलेक्ट्रिकल यंत्रणेची विशेष तपासणी

​वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल यंत्रणेची विशेष तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एअरफिल्ड ग्राउंड, लायटिंग सिस्टिम, डिझेल जनरेटर सेट, यूपीएस यंत्रणा, उपकेंद्रे, केबल पिट्स आणि वीज पडण्यापासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणांची चाचणी घेण्यात आली आहे. खराब हवामानातसुद्धा ही यंत्रणा अखंडितपणे कार्यरत राहील, याची खात्री केली असल्याचे पुणे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

प्रवासी सुरक्षा आणि विनाअडथळा विमान सेवा पुरवणे याला प्राधान्य आहे. यंदाच्या मान्सूनसाठी आम्ही भारतीय वायुसेना आणि हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) यांच्याशी समन्वय साधला आहे, त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज आणि सतर्कतेच्या सूचना वेळेत मिळतील. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आमची आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि आवश्यक उपकरणे २४ तास तैनात आहेत. ​पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सूनच्या काळात विमान वाहतुकीची सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रवाशांची सोय राखण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून विमानांच्या वेळांची खात्री करून घ्यावी.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT