Pune International Airport Pudhari
पुणे

Pune Airport Ebola Virus Alert: इबोला व्हायरस अलर्ट: पुणे विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग व कडक तपासणी सुरू

जागतिक आरोग्य संघटनेच्या इबोला आणीबाणी घोषणेनंतर पुणे विमानतळावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग, आरोग्य तपासणी आणि कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जागतिक आरोग्य संघटनेने दि. 17 मे 2026 रोजी ‌‘बुंदीबुग्यो व्हायरस‌’मुळे होणाऱ्या इबोला आजाराला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर खबरदारीचे उपाय आणि प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग वेगाने सुरू करण्यात आले आहे.

पुणे विमानतळ आरोग्य संस्था आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी सीमाशुल्क, इमिग््रेाशन आणि विमान कंपन्यांच्या समन्वयाने विमानतळावर कडक देखरेख प्रोटोकॉल लागू केला आहे. नक्कीच यासंदर्भात पुणे विमानतळावर बैठक देखील झाली. त्यानंतर बँकॉक आणि दुबईहून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.

विमानतळावरील मुख्य उपाययोजना

  • आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानात उतरण्यापूर्वीच आरोग्य घोषणापत्र (अर्ज) दिले जात आहे, ज्यामध्ये प्रवाशांना त्यांची अचूक माहिती भरणे बंधनकारक आहे.

  • विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे विशेष कॅमेऱ्याच्या माध्यमातून थर्मल स्क्रीनिंग केले जात असून, संशयित रुग्णांना तत्काळ विलग ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • उच्च जोखीम असलेल्या संशयित प्रवाशांना पुढील उपचारांसाठी पुण्याच्या नायडू रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • विमानतळ आरोग्य कर्मचारी, इमिग््रेाशन अधिकारी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटचा वापर आणि स्क्रीनिंगचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रवाशांना तपासणी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन केले आहे. ताप, अशक्तपणा, उलट्या किंवा रक्तस्राव, अशी लक्षणे आढळल्यास प्रवाशांनी तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. सध्या पुणे विमानतळावर इबोलाचा एकही संशयित किंवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, प्रशासन येथील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT