Pune International Airport Pudhari
पुणे

Pune Airport Flight Disruption: पुणे विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात; 9 तास उड्डाणे ठप्प

लँडिंग गिअर निकामी; 106 फ्लाइट्स प्रभावित, प्रवाशांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाला होता. विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्याने हे विमान धावपट्टीवरच अडकून पडले; परिणामी तब्बल नऊ तास विमानतळावरील सर्व नागरी उड्डाणे ठप्प झाली होती. मात्र, विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास धावपट्टी मोकळी करण्यात आल्याने विमानसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

हवाई दलाचे विमान शुक्रवारी रात्री धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे त्याचे लँडिंग गिअर निकामी झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, धावपट्टीच्या मध्यभागी विमान अडकल्याने पुण्यात येणारी अनेक विमाने नजीकच्या विमानतळांकडे वळवली, तर येथून उड्डाण घेणारी आणि येथून उड्डाण करणारी सर्व विमाने थांबण्यात आली. यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते.

टर्मिनलमध्ये तातडीने 500 जादा खुर्च्यांची व्यवस्था

विमानसेवा खंडित झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अशावेळी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली. केवळ तांत्रिक कामच नव्हे, तर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रशासनाने धावपट्टीवर युद्धपातळीवर काम सुरू केले. अडकलेल्या प्रवाशांसाठी टर्मिनलमध्ये तातडीने 500 जादा खुर्च्यांची व्यवस्था केली. तसेच, मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना अन्न आणि पाणी वाटप करण्यात आले.

विमान तिकिटांचा परतावा दिला; विमानप्रवास री-शेड्यूल

हवाई दलाच्या विशेष टीमने तांत्रिक त्रुटी दूर करून धावपट्टीवरून विमान बाजूला करण्याचे काम पहाटेपर्यंत पूर्ण केले. सकाळी 9 तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पहिली धावपट्टी पुन्हा कार्यान्वित झाली आणि विमानांचे ऑपरेशन सुरू झाले. ज्या प्रवाशांचे नुकसान झाले, त्यांना तिकीट रि-शेड्युलिंग आणि रिफंड मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष सहकार्य केले.

तब्बल 106 विमानांचे वेळापत्रक कोलमडले

4विमाने वळवली : या अपघाताच्या घटनेमुळे पुणे विमानतळ प्रशासनाने पुण्यात उतरणारी एकूण 12 विमाने दुसऱ्या विमानतळांवर उतरवली. यात इंडिगोची 8, एअर इंडिया एक्स्प्रेसची 2, तर एअर इंडिया आणि आकासा एअरच्या प्रत्येकी एका विमानाचा समावेश होता.

99 विमानांची उड्डाणे रद्द

  • इंडिगो : 73 फेऱ्या रद्द (35 आगमन, 38 प्रस्थान)

  • एअर इंडिया : 6 फेऱ्या रद्द (3 आगमन, 3 प्रस्थान)

  • एअर इंडिया एक्स्प्रेस : 10 फेऱ्या रद्द (5 आगमन, 5 प्रस्थान)

  • स्पाइसजेट व आकासा एअर : प्रत्येकी 5-5 फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT