पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत अडीच कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून पुण्यात दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानातील एका बेवारस बॅगेतून तब्बल २१ किलो ५00 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असण्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या विमानातील प्रवाशांनी आपापले सामान ताब्यात घेतले. मात्र, एक बॅग दीर्घकाळ कन्व्हेयर बेल्टवर पडून होती. बराच वेळ उलटल्यानंतरही कोणीही त्या बॅगेवर दावा न केल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला.
त्यांनी तत्काळ बॅग ताब्यात घेऊन तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान बॅगेतून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या गांजाचे एकूण वजन २१.५ किलो असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हायड्रोपोनिक गांजा हा सामान्य गांजाच्या तुलनेत अधिक महाग आणि अधिक नशा देणारा मानला जातो. विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियंत्रित वातावरणात त्याची लागवड केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असून, त्याची तस्करी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून केली जाते.
दरम्यान, ही बॅग नेमकी कोणत्या प्रवाशाची होती आणि भारतात ती कोणाकडे पोहोचविण्याचा कट रचला होता, याचा शोध कस्टम विभाग घेत आहे. यासाठी संबंधित विमान कंपनीचे रेकॉर्ड, सामानावरील टॅग, प्रवाशांची माहिती तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुणे विमानतळाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा आणखी एक प्रयत्न उधळून लावण्यात यश आले आहे.