पुणे: आज सकाळी मोबाईलवर आलेला एक व्हिडीओ मेसेज माझे लक्ष वेधून घेतो. क्लिक करताच माझ्या प्रभागातील चौक, रस्ते, उद्याने, रुग्णालये स्क्रीनवर उभी राहतात. पण ती आजची वास्तव परिस्थिती नसते. कोंडी, अरुंद रस्ते किंवा अपुरी सुविधा दिसत नाहीत; त्याऐवजी येत्या काळात विकासकामांनी बदललेला, अधिक सुबक आणि नागरिकस्नेही प्रभाग दिसतो. थोडे बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की, हे सारे एआयद्वारे तयार केलेले आहे.
व्हिडीओच्या माध्यमातून ‘पुढील पाच वर्षांतील प्रभाग’ माझ्यासमोर उलगडत जातो. असे एक नाही, तर अनेक व्हिडीओ मेसेज येतात आणि मला जाणवते की यंदाच्या निवडणुकीत प्रचाराची पद्धत बदलली आहे. शब्दांपेक्षा दृश्यांमधून प्रभागाचे भविष्य दाखवणारी ही संकल्पना मला वेगळी आणि आकर्षक वाटू लागल्याचे महात्मा फुले पेठेतील रहिवासी नीलेश कोंढरे आवर्जून नमूद करतात.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये यंदा प्रचाराचा चेहरामोहरा पूर्णतः बदलताना दिसत आहे. पारंपरिक सभा, भिंतीवरील घोषणा आणि पत्रकांपलीकडे जात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता थेट मतदारांच्या दारात पोहोचली आहे. प्रभागातील आजचे प्रश्न आणि उद्याचे स्वप्न एकाच वेळी ’दृश्य स्वरूपात’ दाखवण्याची किमया एआयमुळे शक्य झाली असून, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ’एआय प्रचार’ हा चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग््रााम, युट्यूब अशा डिजिटल माध्यमांवर एआय-आधारित व्हिडिओ, रील्स आणि ग््रााफिक्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
काही उमेदवारांनी तर आपल्या प्रभागाचा डिजिटल आराखडा तयार करून, “पुढील पाच वर्षांचा विकास” मतदारांसमोर मांडला आहे. भविष्यातील विकास ’ऐकवण्याऐवजी दाखवण्याची’ ही पद्धत मतदारांना कितपत पटते आणि त्याचा मतदानावर किती परिणाम होतो, हे निकालातून स्पष्ट होईल. मात्र, एवढे निश्चित की यंदाच्या निवडणुकीत प्रभागाचे भविष्य आता एआयमुळे स्पष्टपणे दिसू लागले आहे.
आम्ही वर्षानुवर्षे फक्त आश्वासने ऐकत आलो आहोत. पहिल्यांदाच विकासकामे पूर्ण झाल्यावर परिसर कसा दिसेल, हे प्रत्यक्ष व्हिडीओत पाहायला मिळाले. एआयमुळे कल्पना स्पष्ट होते, पण आता दाखवलेले चित्र प्रत्यक्षात उतरते का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.प्रिया तिकोणे, गृहिणी, कसबा पेठ
वाहतूक कोंडीने हैराण झालेले चौक, अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था, अपुरे उद्यान, अपूर्ण ड्रेनेज अशी आजची वास्तव परिस्थिती आणि त्याच ठिकाणी भविष्यात उभे राहणारे कोंडीमुक्त चौक, उड्डाणपूल, मेट्रो मार्ग, स्मार्ट रस्ते, सुसज्ज उद्याने आणि नागरिकस्नेही सुविधा हे सारे आता एआयच्या माध्यमातून व्हिडीओ, थी-डी प्रतिमा आणि ॲनिमेशनद्वारे मतदारांसमोर सादर केले जात आहे. हा प्रभाग आज असा आहे, पण निवडून दिलात तर पाच वर्षांनंतर असा दिसेल, असा थेट संदेश एआयच्या साहाय्याने देण्यात येत आहे. त्यामुळे केवळ शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी मतदारांना विकासकामांचे प्रत्यक्ष दृश्य अनुभवता येत आहे. यामुळे विशेषतः तरुण मतदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे. प्रभागातील नागरिकांमध्येही या नव्या पद्धतीच्या प्रचाराबाबत कुतूहल आहे. आम्हाला फक्त आश्वासने नकोत, तर काम झाल्यावर परिसर कसा दिसेल हे पाहायचे आहे, अशी भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत. एआयमुळे ते शक्य होत असल्याने, प्रचारसभांपेक्षा मोबाईलवरील व्हिडीओ आणि सादरीकरणांकडे नागरिक अधिक लक्ष देताना दिसत आहेत.
तरुण पिढी सोशल मीडियावरच जास्त आहे. भाषण ऐकण्यापेक्षा व्हिडीओ पाहणे आम्हाला सोपे वाटते. एआयमधून दाखवलेले रस्ते, चौक, उद्याने आकर्षक आहेत. मात्र, हे केवळ प्रचारापुरते न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली, तरच त्याचा खरा फायदा होईल.अमित लांडगे, नोकरदार, महात्मा फुले पेठ