टाकळी हाजी/शिक्रापूर : उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील वंदना कैलास घोडे (वय ४२) या महिलेचा शुक्रवारी (दि. १२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बेल्हा-जेजुरी महामार्गावरील महादेववाडी (केंदूर) येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला.
पाच ते सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुलींची लग्नं आटोपून, एकुलता एक मुलगा दत्तात्रयच्या सहवासात वंदना घोडे आयुष्याचा गाडा रेटत होत्या. घर चालवण्यासाठी टाकळी हाजी येथील बँका, पतसंस्था, सोसायटी, सोनारांची दुकाने, दवाखाने अशा ठिकाणी साफसफाईचं काम करून उदरनिर्वाह करत होत्या. मुलगा दत्तात्रय हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. आजी, आजोबा, वडील आणि आता आई हरपल्याने दत्तात्रय मात्र आता एकटा पडला आहे.
शुक्रवारी बांधकाम मजूर कल्याण योजनेतून पाबळ येथे भांड्यांचे वाटप होत असल्याने वंदना गावातील तरुण लक्ष्मण उर्फ पिंटू घोडे याच्यासोबत दुचाकीवर पाबळला गेल्या. तेथे भांडी उपलब्ध न झाल्याने ते केंदुरकडे चालले होते; मात्र महादेववाडीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकर (एमएच १४ एलएक्स ६४६६) ने धडक दिली. दुचाकी घसरून लक्ष्मण कडेला फेकला गेला, तर वंदना रस्त्यावर पडल्या. यावेळी वेगाने टँकर पुढे गेल्याने चाकाखाली वंदना चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीवर मात करत पोटाची खळगी भरणाऱ्या वंदना यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण टाकळी हाजी गाव शोकसागरात बुडाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना दवाखान्यात हलविले. या प्रकरणी लक्ष्मण गयाभाऊ घोडे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले (रा. कडूस, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.