ACB Bribe Case Pudhari
पुणे

Pune ACB Bribe Case: पुण्यात महिला API 28 लाखांची लाच घेताना पकडली

बंडगार्डन परिसरात एसीबीचा सापळा; खासगी व्यक्तीसह दोघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी पकडले. नुकतीच पदोन्नतीने तोटेवार यांची मुंबई लोहमार्ग येथे बदली झाली आहे. त्यांना पुणे शहर पोलिस दलातून कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. शनिवारी (दि.02) दुपारी बंडगार्डन रस्ता परिसरातील एका तारांकित हॉटेलसमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.

वैशाली मुरलीधर तोटेवार (49, रा.ऑफिसर्स क्वार्टर, स्वारगेट पोलीस लाईन) आणि संभाजी शिवाजी चव्हाण (रा.चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका महिला अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या लाचेच्या प्रकरणात पकडण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोटेवार यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेत असताना काही तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपवण्यात आले होते. आठ ते दहा तक्रार अर्जाची चौकशी त्यांच्याकडे होती. त्यापैकी एका प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडे 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. अर्जाची चौकशी तक्रारदाराच्या बाजूने करून त्यातील गैर अर्जदार यांच्या विरुद्ध कारवाई करून तक्रारदाराची जमीन त्यांना परत मिळून देण्यासाठी ही लाच तोटेवार यांनी मागितली होती. सुरुवातीला तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित 28 लाखांची मागणी करण्यात आली.

यानंतर तक्रारदाराने 30 एप्रिल रोजी एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी खासगी व्यक्ती संभाजी चव्हाणला पाठवले होते. बंडगार्डन परिसरातील हॉटेल कोनराडच्या प्रवेशद्वाराजवळ 28 लाख रुपये स्वीकारताना चव्हाणला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त नीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश वाळके करत आहेत.

पोलिस आयुक्तालयातील कार्यालयाची झाडाझडती

कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने पुणे पोलिस आयुक्तालयातील तोटेवार यांच्या कार्यालयासह त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. आयुक्तालयात एसीबीचे पथक झडतीसाठी दाखल झाले, तेव्हा एकच खळबळ उडाली. दिवसभर तोटेवार यांच्या लाच प्रकरणाची चर्चा शहर पोलिस दलात सुरू होती.

कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतली लाच

वैशाली तोटेवार यांची नुकतीच पदोन्नती होऊन त्यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. शुक्रवारी त्यांना पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले होते. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांनी 28 लाखाची लाच घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT