

पुणे: लोहगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 80 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. लोहगाव पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
मनोज मधुकर बरुटे (वय 38, रा. गंगा सोसायटी, कळस, आळंदी रस्ता) असे त्या लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बरुटेविरुद्ध भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारादाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलिस उपनिरीक्षक बरुटे यांनी सुरुवातीला 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक बरुटे यांनी तक्रारदाराला लोहगाव पोलिस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (1 मे) सायंकाळी बोलावले होते. त्यानंतर तक्रारदाराकडून 80 हजारांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करत आहेत.