Water Tanker Pudhari File photo
पुणे

Pune Tanker Fitness Certificate Issue: पुण्यात धोकादायक वास्तव! 673 टँकर फिटनेसशिवाय रस्त्यावर; आरटीओकडून कडक कारवाई

बिबवेवाडी-कोंढवा अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; फिटनेस तपासणीसाठी विशेष मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: गेल्या शनिवारी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर भरधाव टँकरच्या धडकेत निष्पाप हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता असे लक्षात आले की, शहरातील तब्बल 673 टँकरचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाले असूनही ते बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. टँकरचालकांनी तातडीने फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरटीओने केले आहे.

उन्हाळ्यामुळे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची मोठी वर्दळ असते. मात्र, आरटीओच्या आकडेवारीनुसार, एकूण 2,094 पाणी टँकरपैकी 391 टँकर अनफिट आहेत. तसेच, इतर मालाची वाहतूक करणाऱ्या 2,292 टँकरपैकी 282 टँकरचे फिटनेस संपलेले आहे. म्हणजेच, एकूण 4,386 नोंदणीकृत टँकरपैकी 673 टँकर तांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर धावण्यासाठी अपात्र आहेत.

फिटनेस तपासणीत नेमके काय तपासले जाते?

आरटीओकडून फिटनेस तपासणी करताना वाहनाच्या प्रत्येक तांत्रिक बाबीची बारकाईने तपासणी केली जाते. यात प्रामुख्याने टायर आणि बेक टेस्ट केली जाते. यात टँकरचे टायर घासलेले तर नाहीत ना आणि बेक कार्यक्षम आहेत का, याची खात्री केली जाते. रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर्स आणि सर्व दिवे सुस्थितीत असणे अनिवार्य आहे. त्यामुळे पुणे परिसरातील मार्गावरील दिवेमधील कार्यालयात वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. याशिवाय इंजिनची क्षमता आणि प्रदूषण नियंत्रण मानके (पीयूसी) तपासली जातात. मूळ रचनेत बदल करून टँकरची साईज किंवा उंची बेकायदेशीरपणे वाढवली आहे का, हे देखील यावेळी पाहिले जाते. तसेच, चालकाचा परवाना, विमा आणि योग्यता प्रमाणपत्र यांची वैधता तपासली जाते.

टँकर तपासणीसाठी विशेष मोहीम

अनेकदा जुन्या झालेल्या टँकरचे बेक निकामी होणे किंवा स्टेअरिंगवर नियंत्रण न राहिल्यामुळे मोठे अपघात घडतात. प्रशासनाने आवाहन करूनही अनेक टँकरचालक फिटनेस तपासणीसाठी आरटीओकडे फिरकलेले नाहीत. आता अशा अनफिट टँकरवर कारवाईची टांगती तलवार असून, पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून विशेष तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत.

रस्त्यावरील सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमानुसार, नवीन टँकरसाठी पहिली आठ वर्षे प्रत्येक दोन वर्षांनी आणि त्यानंतर दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. सर्व वाहन धारकांनी दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या वाहनांची फिटनेस तपासणी वेळेत करून घ्यावी.
संदीप खडसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT