Pune Modern Cowsheds Pudhari
पुणे

Pune Modern Cowsheds: पुण्यात ३४ गावांतील गायरान जमिनीवर आधुनिक गोशाळा; पशुवैद्यकीय रुग्णालये, चारा बँकेचा मार्ग मोकळा

महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी; जनावरांसाठी उपचार, लसीकरण, पुनर्वसन आणि चारा-पाण्याची सुविधा उभारणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील उपलब्ध गायरान व इतर शासकीय जमिनींचा वापर करून आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालये, चारा बँक, पुनर्वसन केंद्र, लसीकरण केंद्र तसेच जनावरांच्या संगोपनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी दिलेला याबाबतचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे.

शहर विस्तारासोबतच पाळीव जनावरांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांच्यासाठी उपचार, पुनर्वसन आणि संगोपनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. चारा व पाण्याची उपलब्धता नसल्याने काही जनावरे प्लास्टिक व इतर घातक कचरा खातात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याच्या गंभीर मुद्द्याकडे नगरसेवक टिंगरे यांनी दिलेल्या ठरावात लक्ष वेधले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील उपलब्ध शासकीय अथवा गायरान जमिनींचे सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी अत्याधुनिक गोशाळा व पशुवैद्यकीय रुग्णालये उभारावीत, अशी मागणी नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केली होती. या ठरावावर स्थायी समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागविला होता.

प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर ठरावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या प्रकल्पात मोफत जनावरांचे दवाखाने, शस्त्रक्रिया, लसीकरण, निर्जंतुकीकरण, औषधोपचार, चारा व पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच जनावरांचे पुनर्वसन व संवर्धन करण्याची सुविधा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT