Women Safety Pudhari
पुणे

Pune Women Safety: पुण्यातील २४ निर्जनस्थळे अजूनही अंधारात; महिलांच्या सुरक्षेच्या घोषणांना महापालिकेचा ‘खो-खो’!

बोपदेव घाट घटनेनंतर २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेचे आश्वासन; दोन वर्षांनंतरही चतुःशृंगी, पाषाण, औंध-बालेवाडी परिसर दुर्लक्षित

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी निर्जनस्थळांवर सीसीटीव्ही आणि पथदिवे उभारण्याच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार दोन वर्षांनंतरही कायम आहे.

पुणे पोलिसांनी निश्चित केलेल्या २७४ निर्जनस्थळांपैकी अद्याप २४ महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था नसल्याचे महापालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. चतुःशृंगी, पाषाण, औंध आणि बालेवाडी परिसरातील अनेक जागा अजूनही अंधारात असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बोपदेव घाटातील घटनेनंतर शहरातील निर्जन जागांचा आढावा घेऊन पोलिसांनी महापालिकेला २७४ ठिकाणी सीसीटीव्ही आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत १६५ ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. काही ठिकाणी आधीपासूनच दिवे असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, २४ संवेदनशील ठिकाणी अद्याप अंधार कायम आहे.

चतुःशृंगी, पाषाण परिसर दुर्लक्षित

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रस्तावित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस आणि महापालिका प्रशासनाची आढावा बैठक झाली. त्यामध्ये निर्जनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. चतुःशृंगी टेकडी, औंध-बालेवाडी परिसर, पाषाण-सुतारवाडी तलाव, बालेवाडीतील मिटकॉन महाविद्यालयामागील मोकळी जागा, जुना जकात नाका आणि औंध गावातील नदीपात्र परिसरात अद्याप पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याचे समोर आले.

विभागांच्या जबाबदारीचा चेंडू एकमेकांकडे

काही जागा वन विभागाच्या अखत्यारित, तर पाषाण जलशुद्धीकरण केंद्राचा परिसर पाणीपुरवठा विभागाच्या ताब्यात असल्याचे कारण विद्युत विभागाकडून दिले जात आहे. काही ठिकाणी खासगी मालकी आणि जागेचा ताबा नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असतानाही विभागांमध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याऐवजी तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांनंतरही निर्जनस्थळांवरील अंधार दूर झाला नसल्याने महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT