Water  Pudhari
पुणे

Pune 24 Hour Water Supply: पुणेकरांना २४ तास पाण्याची तयारी अंतिम टप्प्यात; ६० झोनमध्ये पुढील महिन्यापासून मीटर रीडिंग!

पाणीवापराच्या आधारे ‘डमी’ बिले तयार होणार; संपूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपट्टी आकारणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेने आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू केली असून, प्रत्यक्ष पाणीवापराचे मोजमाप करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या ६० झोनमध्ये पुढील महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर पाणी मीटरचे रीडिंग घेण्यात येणार आहे. या रीडिंगच्या आधारे डमी बिले तयार करून नागरिकांच्या पाणीवापराचा अभ्यास केला जाणार आहे. मात्र, संपूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपट्टी आकारणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी स्पष्ट केले.

शहरातील पाणीगळती रोखण्याबरोबरच सर्व भागांत समान दाबाने आणि चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची चोवीस तास पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेला तब्बल ११ वर्षे उलटली असून, आतापर्यंत सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत शहरात ८३ पाण्याच्या टाक्या, सुमारे एक हजार किलोमीटर नवीन जलवाहिन्या आणि पावणेतीन लाख पाणी मीटर बसविण्याचे नियोजन आहे. मात्र, टाक्यांसाठी जागा उपलब्ध करून घेण्यातील अडचणी, जलवाहिन्यांच्या कामाला होणारा विरोध तसेच अनेक भागांत पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध यामुळे योजनेच्या कामाला विलंब झाला आहे.

याबाबत पवनीत कौर यांनी सांगितले की, ८३ पैकी ६३ पाण्याच्या टाक्या कार्यान्वित झाल्या असून, येत्या १० तारखेपर्यंत आणखी १६ टाक्या कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांसाठी जागा मिळविण्याच्या अडचणी असून, त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीटर बसविण्यालाही काही भागांत विरोध होत असल्याने कामावर परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील एकूण १४४ झोनपैकी ६० झोनमधील टाक्या, जलवाहिन्या आणि मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे झोन देखभाल-दुरुस्तीसाठी योजनेचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आले आहेत. या झोनमध्ये मीटर रीडिंगसाठी आवश्यक यंत्रणाही विकसित करण्यात येत आहे. त्यानंतर काही झोनमध्ये प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन डमी बिले तयार केली जाणार आहेत.

आधी 'डमी' बिलांचा अभ्यास; नंतरच पाणीपट्टीवसुली

  • पुढील महिन्यापासून काही झोनमध्ये प्रायोगिक मीटर रीडिंग

  • मीटर रीडिंगच्या आधारे डमी बिले तयार होणार

  • नागरिकांच्या पाणीवापराचा घेतला जाणार आढावा

  • संपूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपट्टी आकारणी

  • १४४ पैकी ६० झोनमधील कामे पूर्ण

पूर्ण झालेल्या काही झोनमध्ये पुढील महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर मीटर रीडिंग सुरू केले जाईल. त्यातून पाणीवापराचे प्रमाण आणि बिलिंग व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी डमी बिले तयार केली जातील. मात्र, संपूर्ण चोवीस तास पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांकडून प्रत्यक्ष पाणीपट्टी आकारली जाणार नाही.
पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT